अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत म्हणून आईने नवजात बालकाचा मृतदेह रस्त्यावर फेकला

झारखंड/धनबाद : रायगड माझा ऑनलाईन

 

अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत म्हणून एका महिलेने तिच्या नवजात बालकाचा मृतदेह रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना झारखंडमधील धनबाद येथे घडली आहे. दरम्यान या बाळाच्या मृत्यूमुळे महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याने तिने असा प्रकार केल्याचे त्या महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

सदर महिला ही तिच्या पतीसोबत बिहारमधील गया येथे राहते. बाळंतपणासाठी ती तिच्या माहेरी धनबाद येथे आली होती. 30 सप्टेंबर रोजी या महिलेची एका स्थानिक रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र बाळाला हृदयाचा त्रास असल्याने बाळावर उपचारासाठी दिवसाला आठ हजार रुपये खर्च येणार होता. महिलेच्या माहेरची आर्थिक परिस्थिती देखील ठिक नसल्याने त्यांना एवढा खर्च करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या महिलेने मुलीला घरी नेण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ती मुलीला घरी घेऊन जात असताना मुलीला श्वसनाचा त्रास होऊ लागला व ती दगावली. त्यानंतर त्या महिलेने स्वत:जवळील कपड्याने त्या मुलीला बांधले व तिचा मृतदेह महामार्गावर फेकून दिला.

दुसऱ्या दिवशी स्थानिकांना कपड्यात बांधलेला बाळाचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलीच्या मृतदेहाजवळ त्यांना रुग्णालयाची एक चिठ्ठी सापडली. त्यानंतर रुग्णालयात चौकशी केली असता त्यांना मुलीच्या आईचा पत्ता मिळाला. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली त्यावेळी मुलीच्या आईने मृतदेह रस्त्यावर फेकल्याचे मान्य केले. ‘माझ्या माहेरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यात माझ्या बाळंतपणावर खर्च झाला. त्यामुळे आता बाळाच्या अंत्यसंस्कारांसाठी पैसे उरले नव्हते. त्यामुळे काळजावर दगड ठेवून मी बाळाचा मृतदेह फेकून दिलाा.’ असे तिने सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत