अंधेरीत गोदाम कोसळून दोन ठार, तीन जण जखमी

मुंबई : रायगड माझा वृत्त

अंधेरी पश्चिम येथे प्लायवूडचे गोदाम कोसळून दोन जण ठार झाल्याची घटना आज सायंकाळी 6.16 वाजता घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील यशराज स्टुडिओजवळ मंदार ग्रेनाइट व प्लायवूडचे गोदाम आहे. प्लायवूडच्या गोदामात लोखंडी रॅकवर प्लायवूडचा साठा करून ठेवण्यात आला होता. सायंकाळी या गोदामाचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडल्याचे समजते. यामध्ये ढिगाऱ्याखाली पाच जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने पाचही जणांना बाहेर काढले. मात्र यातील दोघे जण कूपर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाले असल्याचे डॉ. शिवकुमार यांनी सांगितले.

सूरज (28) मुकबूल (27) अशी मृतांची नावे आहेत तर जखमी झालेल्यांची नावे नारद शहानी (21), मोहम्मद तस्लिम (24) आणि महेशकुमार गुप्ता (32) अशी आहेत. तिघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत