अंधेरीत ब्रिजचा फूटपाथ कोसळला, पाच जण जखमी

  • अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली.

  • संपूर्ण रेल्वे वाहतूक पूर्तवत होण्यासाठी मध्यरात्र होण्याची शक्यता

मुंबई: मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फुटपाथचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे  पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.   फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. त्या ब्रिजवरील फुटपाथचा काही भाग कोसळला. हा पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.  ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.

अंधेरीत ब्रिजचा फूटपाथ कोसळला, पाच जण जखमी

ब्रिज कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. 5 जण जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे वाहतूक सुरु करणं हे मोठं आव्हान आहे.

अंधेरी, विलेपार्ले, घाटकोपर, चेंबूर आणि कुर्ल्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. तर लालबाग, परळ, दादर या भागातही पाऊस कोसळत आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने खार सबवे, एस. व्ही रोड आणि एलबीएस रोड अशा सखल भागात पाणी भरले आहे. या पावसाने काही ठिकाणी रस्ते वाहतूक मंदावली आहे.

काल रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत कुलाबा परिसरात 64.2 मिलीमीटर तर सांताक्रूझमध्ये 96.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. दरम्यान 6 जुलैपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत