अंधेरी पूल दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेचीच; उच्च न्यायालयाने झापले

मुंबई : रायगड माझा 

‘मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांसाठी महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे,त्यांनी आपली जबाबदारी झटकू नये, ’ असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला फटकारले आहे. ‘प्रत्येकवेळी पूल पडण्याची वाट का पाहता,पालिकेने सर्व पुलांचे याआधीच ऑडिट का केले नाही,’ असं विचारत उच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेतला आहे. पालिकेचे नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरलं जात नाही, असा सवालही यावेळी उच्च न्यायालयाने केला.

दुर्घटना घडल्यानंतर त्याची नक्की जबाबदारी कोणाची यावरुन दरवेळी पालिका आणि रेल्वे यांच्यात कलगीतुरा रंगतो. त्यावर ‘रेल्वे ही काही परदेशी संस्था नाही,त्यामुळे इथं हद्दीचा प्रश्न निर्माणच होत नाही,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘आजही रेल्वेवरच मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक ताण पडतो. वाहतुकीसाठी  सागरी मार्गाचा गांभीर्याने विचार का केला जात नाही,’ असा प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान,स्मिता ध्रुव यांनी एलफिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरी संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या १२ जुलैला होणाऱ्या सुनावणीस महाधिवक्ता आणि केंद्र सरकारच्या मुख्य वकिलांना हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत