अंबरनाथमध्ये मनसेचा ASB कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खळखट्याक!

अंबरनाथ : रायगड माझा वृत्त 

मराठी कामगारांना कामावरुन काढल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथमधील एएसबी इंटरनॅशनल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्यानंतर मनसेने निवेदन देऊन चर्चा करुन तोडगा काढायचा प्रयत्न केला होता. मात्र कंपनी प्रशासन बधत नसल्याने मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आजच कंपनीला आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एएसबी कंपनीच्या कामगारांना गाठत मारहाण केली आणि पळवून लावलं.

एएसबी कंपनी स्थानिकांना कामावरुन काढते आणि परप्रांतीयांना कामावर घेते. तसंच अंबरनाथमध्ये भाड्याचे फ्लॅट घेऊन ते या कर्मचाऱ्यांना देते, असा मनसेचा आरोप आहे. असेच भाड्याने राहणारे कामगार अंबरनाथच्या ग्रीनसिटी भागात सेकंड शिफ्टसाठी कंपनीत जात होते. त्यावेळी बसची वाट पाहात उभे असताना मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष धनंजय गुरव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या कामगारांना गाठून मारहाण केली आणि त्यांना पिटाळून लावलं. एएसबी इंटरनॅशनल ही जपानी कंपनी आहे, ज्यात बाटल्यांचे मोल्ड तयार केले जातात. टप्परवेअरच्या आणि अन्य बाटल्या इथे बनतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत