अकरावी प्रवेशाची झाडाझडती पुढील आठवड्यापासून

प्रवेश क्षमतेबरोबरच बायोमॅट्रीक हजेरी व नोंदवह्याही तपासणार

पुणे : रायगड माझा वृत्त 

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अखेर पुढील आठवड्यापासून अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून अकरावी प्रवेशाची झाडाझडती सुरू केली जाणार आहे. यामध्ये भरारी पथकांच्या माध्यमातून शैक्षणिक नोंद, बायोमॅट्रीक हजेरी, प्रवेश क्षमतेनुसार प्रवेश आदी सर्व बाबी तपासण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांनी दिली.
राज्यात एकाच वेळी 6 महापालिकांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या विशेष फेरीतील प्रवेश देणे सुरू असून जवळपास प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. मात्र, हे प्रवेश नियमानुसार दिले आहेत का, कोट्यातील प्रवेश हे योग्यरित्या दिले आहेत ना, त्याबाबत महाविद्यालयांकडे सर्व कागदपत्रे आहेत ना, प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद ऑनलाईनमध्ये करण्यात आली आहे ना… आदी सर्व बाबींची तपासणी केली जाणार आहे. त्यात यंदा नव्याने समोर आलेल्या मुद्‌द्‌यांचीही तपासणी होणार आहे.

अनेक महाविद्यालयांचे कोचिंग क्‍लासेसशी साटेलोटे असल्याने सर्वच विज्ञान शाखेच्या अकरावी बारावीच्या वर्गांना बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्य करण्यात आलेली होती. 15 जुलैपासून याची अंमलबजावणी करणेही गरजेचे होते. यासाठी महाविद्यालयांनी ही यंत्रणा बसवली आहे का, त्यानुसार हजेरी होते का, त्याचराबरोबर प्रत्येक महाविद्यालयांनी त्यांच्या क्षमतेनुसारच प्रवेश केले आहेत ना… हेही या तपासणीत पाहिले जाणार आहे. ही सर्व तपासणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही केली जाणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

अकरावी प्रवेश क्षमतेपेक्षा संबंधित महाविद्यालयातून बारावी प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. अशी तक्रार मागील वर्षी नगरमधील पाथर्डी येथील महाविद्यालयाबद्दलही आली होती. तसेच राज्याकडूनही याबाबत सूचना आल्या आहेत. त्यामुळे विशेष फेरी संपली की, महाविद्यालयांची वरील सर्व मुद्‌द्‌यांची तपासणी करण्यात येणार आहे.
– मिनाक्षी राऊत, प्रभारी उपसंचालक, पुणे शिक्षण विभाग

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत