अजित पवारांच्या कामावर लक्ष द्यायलाच उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; भाजपची तिरकस टीका

पुण्यावर अजितदादांचे लक्ष, काळजी ...

मुंबई: महाराष्ट्र News 24

मुख्यमंत्री घरी बसले तर जनक्षोभ निर्माण होईल, हे शरद पवारांना माहिती होतं. म्हणूनच कॅप्टननं घरी राहून काम करावं, असा पवारांनी सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अजित पवारांच्या कामावर लक्ष द्यायलाच उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असल्याची तिरकस टीका दरेकर यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (गुरूवारी) एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक सुरू झाली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांवर भाजपने निशाणा साधला आहे.

कॅबिनेट बैठकीबाबत सरकार गंभीर नाही. म्हणून दोन आठवड्यांनी ही बैठक होते. विशेष म्हणजे कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या लहरीप्रमाणे होतात असा आरोप देखील दरेकर यांनी केला आहे.

आणखी काय म्हणाले प्रवीण दरेकर…

राज्यात रोज ज्या मानवतेला काळिमा लावणाऱ्या घटना घडत आहेत, त्या थांबवाव्या लागतील. अन्यथा जनतेचा राज्यात उद्रेक होईल, आणि सरकारला ते आवरणे कठीण होईल, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

अमरावतीतील बडनेरा येथे एका मुलीच्या गुप्तांगामधून स्वॅब काढण्याचा प्रकार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे.

तसेच चाकणला 17 वर्षाच्या मुलीची हत्या झाली. त्याचप्रमाणे रोहा येथे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या झाली.

पनवेलमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला. पुणे, जालना, बीड येथेही रोज शरम आणणाऱ्या घटना घडत आहेत. मात्र, सरकारचं याकडे अजिबात लक्ष नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. माझे सरकारला सांगणे आहे, आता तरी जागा व्हा, असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत