अटल बिहारी वाजपेयी पंचतत्वात विलीन… मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलजींच्या चितेला अग्नी दिला.

त्यांना अखेरचा निरोप देताना सगळा देश हळहळला. देशाला नवी दिशा देणारा बाप माणूस हरवल्याची भावना प्रत्येकाच्याच मनात होती. अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला लष्कराच्या तिन्ही दलांकडून सलामी देण्यात आली. तसेच  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यावर पुष्पचक्र अर्पण केले.


नमिता भट्टाचार्य यांनी जेव्हा अग्नी दिला तेव्हा सगळेच नेते, उपस्थित हात जोडून उभे राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव पंचत्त्वात विलीन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांचेच डोळे भरून आले होते.

अटलजींचे पार्थिव शुक्रवारी सकाळी दिल्लीतील निवासस्थानातून भाजपा मुख्यालयात नेण्यात आले. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र  मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित  शाह, लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, खासदार हेमा मालिनी आदी नेत्यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दोनच्या सुमारास अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. प्रचंड मोठ्या जनसागरात ही अंत्ययात्रा निघाली होती. त्यानंतर अटलजींचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले.

वाजपेयी हे ११ जूनपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाने ग्रासले होते आणि त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.

गुरुवारी रात्री वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. पक्षाचे नेते, वाजपेयींचे निकटवर्तीय तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तिथून शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात नेण्यात आले. वाजपेयींचे निवासस्थान ते भाजपा मुख्यालय या मार्गावर वाजपेयींच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. आवडत्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, डीएमकेचे नेते ए राजा यांनी देखील वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत