अण्णांबद्दलची कुठलीही बातमी वाचत नाही : पवार

 पुणे : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for ANNA HAZARE AND SHARAD PAWAR

लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. अण्णा हजारे यांच्या उपोषणाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी अवघ्या दोन वाक्यांत हे उत्तर दिलं. राज्यपालांच्या अभिभाषण प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरही त्यांनी सडकून टीका केली. ‘संसदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय प्रथा आणि संस्कृतीला हरताळ फासला. मोदींची विचारसरणी, संस्कार याच्याशी सुसंगत असेच ते भाषण झाले, असा चिमटाही त्यांनी काढला.

‘मी ज्या सभागृहात मी बसतो, तेथे हे भाषण झालेले नाही. संसदेचे अखेरचे अधिवेशन होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, नरसिंह राव यांच्यासह अन्य पंतप्रधानांच्या संसदेच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणांमध्ये सभ्यता, संसदेबद्दल आदर होता. संसदेतील सर्व सदस्य, राजकीय पक्ष यांच्याबद्दल धोरणात्मक वेगळी मते असू शकतात. परंतु, त्या लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्याची भूमिका माजी पंतप्रधानांची होती. त्याचे कारण, त्याप्रकारचे संस्कार त्यांच्यामध्ये होते. मोदी यांच्या भाषणातून या प्रथेला हरताळ फासला गेला,’ असे पवार म्हणाले.

सध्या तरी आमच्यासमोर लोकसभेची निवडणूक आहे. जोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीचा विचार आम्ही करत नाही. राज्य सरकारने आठ महिने असतानाही विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला, तर एका दृष्टीने महाराष्ट्राची सुटका होईल, अशी खोचक टीकाही पवार यांनी केली. अपेक्षित बदल आधीच मिळणार असेल, तर जनतेला समाधान लाभेल, असेही पवार म्हणाले.

राष्ट्रीय पातळीवर आघाडी नाहीच!

‘राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी करण्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. मात्र, आमचे प्रयत्न राज्यांच्या पातळीवर आघाडी करण्यासंदर्भात सुरू आहेत. कारण प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. ज्या राज्यात जे पक्ष भाजपला हरवू शकतात, त्यांना महत्त्व दिले पाहिजे. अशा पक्षांशी चर्चा झाली पाहिजे. ज्या पक्षांना यामध्ये रस आहे, त्यांच्याशी बोलून अधिक प्रयत्न झाले पाहिजेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन विचार केला आहे. अद्याप दोन तीन मतदारसंघाबाबत निर्णय झालेला नाही. परंतु, आगामी काळात त्यावरही निर्णय घेऊ,’ असेही पवार म्हणाले.

‘शिरूरमध्ये चांगले उमेदवार’

शिरूर, मावळ या मतदारसंघातून अजित पवार तसेच त्यांचे चिरंजीव पार्थ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघांमध्ये ‘राष्ट्रवादी’कडे चार ते पाच चांगल्या उमेदवारांचे प्रस्ताव आहेत. त्या-त्या मतदारसंघातील विधानसभेच्या सहकार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ. पार्थच्या नावाची चर्चा जशी आहे, तशी माझ्याही नावाची चर्चा होते, असे म्हणत त्यांनी पवार कुटुंबीयांच्या उमेदवारीबद्दलचे भाष्य टाळले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत