अण्णा हजारेंच्या ९० टक्के मागण्या पूर्ण, त्यांनी उपोषण मागे घ्यावे : गिरीश महाजन

रायगड माझा वृत्त 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठेवलेल्या ९० टक्के मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण झाल्या असून अण्णांनाही याची माहिती देण्यात आली आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आज (मंगळवार) अण्णा हजारेंच्या नियोजित उपोषणाला राळेगणसिद्धी येथे सुरुवात झाली. या ठिकाणी महाजन यांनी अण्णांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची बाजू मांडली.

महाजन म्हणाले, अण्णा हजारेंनी सरकारसमोर ठेवलेल्या विविध मागण्यांपैकी लोकपाल-लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी असून यापूर्वी अॅड. राव या विधीतज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची स्थापना झाली होती. मात्र, राव यांचे आकाली निधन झाल्याने हे काम थांबले होते. मात्र, नुकतेच २७ सप्टेंबर रोजी ८ सदस्यांची नवी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर लोकायुक्तांच्या नियुक्तीला वेग येईल.

त्याचबरोबर शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नांवर अण्णांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यानुसार, कृषी मुल्य आयोगाची स्थापना करण्याबाबतची अण्णांची एक महत्वपूर्ण मागणी होती. या मागणीनुसार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव मिळायला हवा, अशा मागण्या आहेत. या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती, त्यामुळे अण्णांची ही मागणी पूर्ण झाल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.

तसेच शेतीच्या उपकरणांवर लावण्यात आलेला जीएसटी कमी करण्यात यावा, अशी देखील मागणी अण्णा हजारेंनी केली होती. सुरुवातीला ठिबक सिंचन, स्प्रिंकलर्स या शेती उपकरणांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला होता. त्यानंतर सरकारने तो १२ टक्क्यांवर आणला. मात्र, अण्णांनी तो ५ टक्क्यांवर आणण्याची मागणी केली कारण यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल, त्यामुळे पाण्याची बचत होते. अण्णांच्या या मागणीवरही सरकारच विचार करीत असून कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांना लेखी अश्वासन दिले आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

निवडणुकीच्या संदर्भातही अण्णा हजारेंनी काही मागण्या ठेवल्या होत्या, यामध्ये विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यापासून रोखावे तसेच नोटाबाबतही असलेल्या मागणीकडे सरकार गांभीर्याने पाहत असल्याचे महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे अण्णांच्या प्रमुख मागण्या बहुतांश पूर्ण झालेल्या असून अण्णांनी आपले उपोषण थांबवावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत