अत्याधुनिक केराच्या टोपल्या झाल्या कचऱ्यात जमा : नागपूर

नागपूर : रायगड माझा वृत्त 

‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’चा नारा देणाऱ्या महानगरपालिकेने लावलेले अत्याधुनिक केराच्या टोपल्या कचऱ्यात जमा झाल्या आहेत. स्वच्छतेच्या हेतूने शहराच्या मुख्य रस्त्यांवर लावलेल्या कचऱ्याच्या पेट्यांमधून कचरा काढलाच जात नाही. तसेच अनेक ठिकाणी पेट्या चोरी गेलेल्या आहेत.

परिसरातील नागरिकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अजब उत्तर ऐकायला मिळत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील कचऱ्यांच्या पेट्यांचे पालकत्व नागरिकांचेच असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पेट्यांचे पालकत्व नेमके कंत्राटदारांचे, नागरिकांचे, स्थानिक लोकप्रतिनिधींचे की मनपाचे हे स्पष्ट होण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी या पेट्या गायब झाल्या असून, केवळ लोखंडी सांगाडे उरले आहेत. मनपाच्या जुलै महिन्यातील अहवालानुसार सुमारे तीसहून अधिक पेट्या तुटल्या आहेत. अनेक भागांत पेट्यांभोवती कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. ही समस्या खामला, त्रिमूर्तीनगर, रामदासपेठ, शंकरनगर, मानेवाडा, नरेंद्रनगर भागात मोठी असून, कनकचे कर्मचारी कचरा जमा करण्यासाठी येत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

शहरात सुमारे १,२०० ठिकाणी अशा द्विरंगी पेट्या लावल्या असून, प्रत्येक पेटीची क्षमता सुमारे २०० किलो कचरा वहन करण्याची आहे. वरदळीच्या ठिकाणी व बाजारपेठेत या पेट्या लावल्या आहेत. सामान्य नागरिकांना व चिल्लर विक्रेत्यांना त्याचा सहज फायदा होईल हाच हेतू आहे.

‘कनक’ जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ
नागपूर महानगरपालिकेने शहर स्वच्छ ठेवण्याचे कंत्राट २००९ पासून कनक रिसोर्सेसला दिले आहे. त्यावर भांडेवाडीत प्रक्रिया केली जाते. मात्र, कनक जबाबदारी पाळण्यात असमर्थ असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत