अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री देण्यास सेनेच्या आमदारांच्या विरोध?

कर्जत : विकास मिरगणे

पालकमंत्रीपदावरून आता राष्ट्रवादी शिवसेना संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वाधिक आमदार असल्याने रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा करावा असाही सूर आता शिवसेना आमदारांमधून उमटू लागला आहे. त्यामुळे अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री होण्याच्या अडचणी वाढणार आहेत. 

रायगडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष नेहमीच राहिला आहे. रायगडच्या राजकारणात आपल्यापेक्षा कोणीही वरचढ होऊ नये अशी सुनील तटकरेंची भूमिका राहिली आहे. गेल्या सरकारमध्ये रायगडला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नव्हते. त्यामुळे पालकमंत्री राहिलेल्या रवींद्र चव्हाण यांनी देखील शिवसेनेची कोंडी केली होती. आताही रायगड मधून सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या शिवसेनेला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना पहिल्यांदाच निवडून आलेल्या अदिती तटकरे याना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने शिवसेनेमध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किमान रायगडचा पालकमंत्री तरी शिवसेनेचा करा अशी आग्रही मागणी शिवसेनेतून पुढे येत आहे. तटकरे नको अन्य कोणीही चालेल असा  शेतकरी कामगार पक्षाचाही सूर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावरून संघर्षास  आतापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांशी कसे जुळवून घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत