अनाधिकृत बांधकामांमुळे नेरळ महामार्गाला आले नाल्याचे स्वरूप

नेरळ: अजय गायकवाड 

कर्जत कल्याण महामार्गाला लागून असणाऱ्या शार्विल या शाळेच्या बांधकामामुळे आज महामार्गावर पाणी आल्याने या महामार्गाला नाल्याचे स्वरूप आले होते. दरम्यान या पाण्यातून आपले वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.

कर्जत तालुका सध्या अनधिकृत बांधकामाच्या विळखात सापडला आहे. नेरळमध्ये मात्र व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरात शिरू लागले आहे. या संदर्भात अनेकांनी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आज सकाळपासून मुसळधार पावसाने कर्जत तालुक्याला चांगलंच झोडपलं आहे. अनधिकृत बांधकामुळे नैसर्गिक नाले बुजवून टाकण्यात आल्याने हे पाणी आता महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या बांधकामांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. ही शार्विल शाळा अगदी महामार्गाला लागून आणि अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीजवळ असल्याने बांधकामामुळे ही शाळा चर्चेचा विषय बनली आहे. नैसर्गिक वाहणाऱ्या नाल्यावर शाळेचे बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे बिल्डरांबरोबर रेल्वेने सुद्धा पाय पसरले असल्याचे समोर येत आहेत. गेल्यावर्षी तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि रेल्वेने कोणतीही उपाययोजना न केल्याने नेरळच्या पूर्व भागातील घरांमध्ये यावर्षी देखील घरात पाणी शिरले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामांचा विळखा आणि ग्रामपंचायती बरोबर रेल्वेचे दुर्लक्ष यामुळे आता दाद तरी कोणाकडे मागावी असा नेरळकरांसमोर प्रश्न आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत