अनिकेत तटकरे विजयी!

तटकरेंच्या विजयासाठी नारायण राणे आणि भाजपाची मते ठरली निर्णायक

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त 

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे अँड. राजीव साबळे यांचा पराभव केला. या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना ६२० तर राजीव साबळे यांना ३०६ मतं मिळाली असून १२ मतं बाद ठरली आहेत.

या निवडणुकीत ९४० पैकी शिवसेनेकडे ३०९ मतं होती, तर भाजपकडे १४५ मतं होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकापकडे २७५ मतं, स्वाभिमान पक्षाकडे ९१, मनसे १३ आणि उर्वरित- अपक्ष १०७ मतं होती. मात्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादीचं पारडं जड झालं होतं, त्यातच शेवटच्या क्षणी भाजपची मतं सुद्धा आपल्याकडे वळविण्यात सुनील तटकरे यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आकड्यांच्या खेळात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच पर्यायाने सुनील तटकरे यांनी बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.

सोमवारी झालेल्या मतदान प्रक्रियेवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १०० टक्के मतदान झालं होतं. तर रायगडमध्ये  ४६९ पैकी ४६७ मतदारांनी मतदान केलं होतं. या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते तर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत