अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न

मुंबई : रायगड माझा वृत्त

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. हा दौरा राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो, याची कल्पना असलेल्या भाजपशासित उत्तर प्रदेश सरकारने ठाकरे यांच्या कार्यक्रमांना अद्याप प्रशासकीय परवानग्याच दिलेल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदिर बांधा, अन्यथा तो “चुनावी जुमला’ होता असे जाहीर करा, असे आव्हान देत आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात केली होती. ठाकरे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेने सर्व शक्ती पणाला लावली आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी पक्षाचे संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासारखे नेते यापूर्वीच अयोध्येत दाखल झाले आहेत. 24 तारखेला ठाकरेंच्या हस्ते शरयू तिरावर पूजन करण्यात येणार आहे. तेथे महाआरतीही होणार आहे. हा संपूर्ण भाग सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. ठाकरे 25 नोव्हेंबरला रामजन्मभूमीच्या जागेचे दर्शन घेतील. त्यानंतर ते साधू-संतांच्या भेटी घेणार आहेत. अयोध्येत ठाकरेंची जाहीर सभाही होणार आहे. त्यांची राज्याबाहेरील ही पहिलीच मोठी जाहीर सभा असेल.

ठाकरेंच्या या दौऱ्यादरम्यान अडथळे येऊ नयेत, यासाठी राऊत यांनी दोन आठवड्यांपूर्वी लखनौ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेतली होती. ठाकरेंच्या सर्व कार्यक्रमांसाठी आवश्‍यक परवानग्या मिळवून देण्याचे आश्‍वासन आदित्यनाथ यांनी या वेळी दिले होते; मात्र उत्तर प्रदेश प्रशासन या परवानग्या देण्यात चालढकल करत असल्याचे चित्र आहे.

शरयू नदी तिरावर पूजेला सर्वोच्च न्यायालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असली तरी अयोध्या नगर निगम आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून ती मिळालेली नाही. यासंदर्भात गेल्या बुधवारी चार आस्थापनांच्या आयुक्तांची बैठक होणे अपेक्षित होते, मात्र ही बैठक अद्याप झालेली नाही.

परवानग्या मिळतील! 
या मुद्द्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर थेट टीका केली नाही. मात्र शनिवारी किंवा सोमवारी परवानग्या मिळतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत