अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटींचा नीती आयोगाच्या समितीत सहभागी होण्यास नकार

अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांनी नीती आयोगाच्या नव्या समितीवर जाण्यासाठी नकार दर्शवला आहे. २०२० पर्यंत शेतीक्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी ही नवी सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे.

आपल्या नकारामागील कारण देताना गुलाटी म्हणाले, यापूर्वीच्या ३ ते ४ समित्यांनी सुचवलेल्या सूचनांचीच अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पुन्हा तशाच स्वरुपाची नवी समिती स्थापन करुन काय साध्य होणार आहे. यामध्ये नवीन असे काहीही असणार नाही.

गुलाटी म्हणाले, केवळ समित्यांची वर्तुळं आखत बसण्यापेक्षा धोरणकर्त्यांनी चार-पाच प्रमुख गोष्टींवर आपले लक्ष्य केंद्रित करायला हवे, आणि त्याची योग्य अंमलबजावणी करायला हवी.

ते पुढे म्हणाले, नव्या समितीतील सहभागाबाबत आपल्याला कुठल्याही प्रकारे विचारणा करण्यात आलेली नाही. जर तुम्ही अधिकृत समिती स्थापणार असाल तर त्यामध्ये तुमचे नाव घेत आहोत असे सांगण्याचे सौजन्य तरी दाखवायला हवे. मात्र, मला कसलीही माहिती नसताना या समितीमध्ये माझे नाव आढळून आले असे गुलाटी यांनी म्हटले.

यापूर्वी नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अरविंद पनगडिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यासाठी आपल्याला पुन्हा शिक्षण क्षेत्रात परतायचे आहे हे कारण त्यांनी दिले होते. नीती आयोगावर येण्यापूर्वी पनगडिया हे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.