अलिबागमध्ये गोमांस विकणाऱ्या तिघांना अटक; ७५ किलो गोमांस जप्त!

अलिबाग : रायगड माझा वृत्त 

अलिबाग शहरात गुरांची कत्तल करून गोमांस विकले जात असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे मांडवी मोहल्ला परिसरातून पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी ७५ किलो गोमांस जप्त केले. तसेच तिघांना अटक केली. या गोमांसाची किंमत १७ हजार रूपये असल्याचीही माहिती समोर आली आहे.

अब्दुल सलाम शहागीर सैय्यद, शराफत नजीर फकी, ईद्रीस फरीदान चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मांडवी मोहल्ला येथील रहिवासी आहेत. हे तिघे गोमांस विक्रीचा व्यवसाय करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख यांना या संदर्भातील खात्रीशीर माहिती मिळाली होती.ज्या आधारे शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोहल्ल्यातील घर क्रमांक १०१ आणि १०२ येथे धाड टाकली. यावेळी प्लास्टिकच्या कापडात गुरांचे मांस लहान मोठे तुकडे केलेले आढळून आले. गुरांची खुरे आणि दोन मुंडकी आढळून आली. कत्तलीसाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि मांस पोलीसांनी जप्त केले आणि यावेळी हजर असणाऱ्या तिघांनाही ताब्यात घेतले.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानच्या कलम ४२९, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम ५(क), ९. आणि भारतीय प्राणी संरक्षण अधिनियमच्या कलम १० अन्वये तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सस्ते, सहाय्यक फौजदार बिडकर, पोलीस हवालदार डि.डी. बिर्जे, बी. एम. चिमटे, पी.व्ही.म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक तोडकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.