अवघड वाटेवर आमदार प्रशांत ठाकुरांचे  ट्रेकिंग

माथेरान : श्वेता शिंदे 

माथेरानचा निसर्ग सर्वांनाच भुरळ घालतो. निसर्गाची हीच साद ऐकून प्रशांत ठाकूर यांनी आज तरुणाईला सोबत घेत धोदानी मार्गे माथेरान ट्रेकिंग केले. निसर्गाच्या अनवट वाटांमधून निसर्गाची विविध रूपे डोळ्यांत साठवत आमदारांसोबत केलेले हे ट्रेकिंग तरुणांसाठी संस्मरणीय झाले. 

एरवी राजकारणातील अवघड डोंगर सर करणाऱ्या प्रशांत ठाकूर यांनी प्रत्यक्षात डोंगर सर करण्याचा  निर्णय घेतला. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तरुणाईला साद घालत त्यांनी माथेरानचा ट्रेक आयोजित केला. त्यांच्या आवाहनाला तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला. चारशेहून अधिक युवक आणि विविध राजकीय पदाधिकारी या ट्रेकमध्ये सहभागी झाले होते. माथेरानच्या सनसेट पॉईंटच्या पायथ्याला असलेल्या धोदानी येथून या ट्रेकिंगला सुरवात झाली. तरुणाईचा उत्साह आणि सोबत पाऊस होताच.

सनसेट पॉईंटचा उभा डोंगरकडा, अवघड पायवाट सर करताना अनेकांनी हे क्षण आपल्या कॅमेरात बंदिस्त केले. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले माथेरान ट्रेकिंग डेस्टिनेशन म्हणून आपली ओळख निर्माण करेल असा आशावाद आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. यासाठी काही सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी वनविभागाला सूचित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील प्रशांत ठाकूर यांनी माथेरानला ट्रेकिंग केले आहे.

पनवेलवरून ट्रेकिंग करत माथेरानला आलेल्या या सर्वांचे भारतीय जनता पक्षाच्या माथेरान महिला शहराध्यक्षा  बबिता शेळके यांनी स्वागत केले. सर्वानी माथेरानला सहभोजन केले आणि पुन्हा तोच अवघड डोंगरकडा  उतरून पनवेलकडे प्रयाण केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.