अवैध धंद्यांविरोधात भोसरी मध्ये श्राद्ध आंदोलन

पिंपरी : रायगड माझा

 शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यावर “श्राद्ध आंदोलन’  करण्यात आले. यावेळी दारूच्या बाटलीला पुष्पहार घालून पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पोलिसांना शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची व अवैध धंदे बंद करण्याची सुबुद्धी यावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात सचिव दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष राजू शेरे, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संपर्क प्रमुख हरिश्‍चंद्र तोडकर, प्रवक्‍त्या सॅन्ड्रा डिसोझा, फ्रान्सिस गजभिये, चिंचवड विभाग प्रमुख फारुख शेख, भोसरी विभाग प्रमुख चॉंद सय्यद, भारिपचे आकील सय्यद, दिवेश पिंगळे, सतीश कदम, अस्लम शेख, तौफिक पठाण, बाळू अडागळे, शिवाजी धोत्रे, अनिल कारेकर, शेरखान पठाण, आरती कोळी, जमीर सय्यद, मन्सूर शेख यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांना संबोधन करताना सिद्दीक शेख म्हणाले, “पोलिसांच्या व राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारांना व अवैध धंद्यांना अभय मिळाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा पोलिस प्रशासन याची गांभीर्याने दाखल घेत नाही. पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ठिकाणाहून संपूर्ण शहरात अवैध दारू पुरवठा होतो. तरी पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे पोलिस उपायुक्तांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे. 
शेख पुढे म्हणाले, “सीमारेषेवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून कुटुंबापासून दूर राहून रात्रंदिवस पहारा करतात. परंतु ज्यांच्यावर जनतेच्या रक्षणाची व शहरात शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी आहे. ते पोलिस मात्र, शहरातून कोट्यवधी रुपयांचे हफ्ते वसुली रॅकेट चालवीत आहेत.” 
आंदोलनानंतर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना निवेदन देण्यात आले. तसेच भोसरी परिसरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेस सकारात्मक प्रतिसाद देत शिंगाडे यांनी अवैध धंदे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल व कारवाईचा अहवाल वेळोवेळी सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत