अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात ५ ठार

अहमदनगर : रायगड माझा वृत्त 

औरंगाबादहून पुण्याला जात असलेल्या खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ प्रवासी जागीच ठार झाले. अहमदनगर- पुणे महामार्गावर आज पहाटे हा अपघात झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे.
नगर-पुणे महामार्गावर राळेगणसिद्धी फाट्यावर आज पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात प्रचंड भीषण होता. भरधाव बसची धडक बसताच ट्रक उलटला. त्यामुळे बसमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यातील तीनजण गंभीर जखमी आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य करत आहेत. बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

या अपघातानंतर अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहतूककोंडीमुळे रस्त्यावर उलटलेला ट्रक बाजूला काढण्यासाठी क्रेनही घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. अपघातामधील काही जखमींना शिरूर येथील रुग्णालयात तर, काहींना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातस्थळापासून नगर व पुणे अशा दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत