अादिवासी भागातील मुलांना मामाच्या गावाला जाऊया अंतर्गत पुणे दर्शन

पुणे : रायगड माझा

अंघोळीची गोळी संस्थेने आयोजित केलेल्या मामाच्या गावाला जाऊया उपक्रमांतर्गत अकाेले तालुक्यातील अादिवासी भागातील मुलांना पुणे दर्शन घडवण्यात येत आहे. ११ मे ते १६ मे या दरम्यान हा उपक्रम राबवला जात आहे. ‘स्वप्न पहा आणि मोठे व्हा’ अशी काहीशी यावर्षीच्या कार्यक्रमाची थिम यावेळी ठेवण्यात आली आहे. यामध्ये या भागातील मुलांनी पुण्यात येऊन फक्त सहलीचा आनंद घेण्यापेक्षा त्यांना विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवल्या जात आहेत.

या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असुन अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील १० मुले आणि १० मुली यावेळी पुण्यात आले आहेत. त्यांची रहाण्याची व्यवस्था विद्यार्थी सहायक समीती, पुणे येथे करण्यात आली आहे. यावर्षीच्या उपक्रमात नक्की नविन काय आहे याविषयी विचारले असता अंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, “यावेळी आलेली मुले ही अकोले तालुक्यातील जवळपास १० वेगवेगळ्या गावातील आहेत. ही अशी गावे आहेत जिथे अजून लाईटही पोहचली नाही. अनेक विद्य़ार्थी अशा शाळेत शिकत आहेत ज्या शाळेत आठवड्यात मुलांना केवळ १ ते २ तास शिकवले जाते.

या उपक्रमासाठी विद्यार्थी सहायक समीताचे प्रभाकर पाटील, मराठवाडा मित्र मंडळाचे भाऊसाहेब जाधव, ब्लेड्स आॅफ ग्लोरीचे रोहन पाटे, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अधिकारी वर्ग तसेच पेशवे पार्क दाखवण्यासाठी गणेश साळेगावकर, सागर वडके आणि अजय पवार यांचे सहकार्य मिळाले. गेल्या दोन दिवसांत मुलांना शनिवारवाडा, राजीव गांंधी प्राणी संग्रहालय, ब्लेड्स अाॅफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय आणि बालेवाडी क्रीडा संकुल दाखवले आहे. दिनांक १३ मे पासुन संध्याकाळच्या सत्रात विविध मान्यवरांच्या कार्यशाळा तसेच मार्गदर्शन देणारे खास कार्यक्रम ठेवले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत