अॅनी बेझंट यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान

शरद पवारांचा गोपाळ शेट्टींना टोला!

पुणे : रायगड माझा वृत्त 

ख्रिश्चनांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हते असे विधान आज एका मंत्र्याने केले. या मंत्र्याला आपल्या विधानाबद्दल स्वतःची लाज वाटायला हवी. कारण, काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे आणि त्यामध्ये ख्रिश्चिन असलेल्या अॅनी बेझंट यांचाही वाटा होता, असा संदर्भ देत राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी भाजपा नेते गोपाळ शेट्टी यांना टोला लगावला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ईद मिलन आणि सुफी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.


पवार म्हणाले, ज्याच्या हातात सत्ता असते त्याने समाजात सलोखा कसा टिकून राहिल हे पाहिले पाहिजे तसेच इतरांच्या विकासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. मात्र, आज याचीच मोठी कमतरता जाणवत आहे. लोकांवर हल्ले होताना आपण पाहत आहोत. यामध्ये कधी मुस्लिम, कधी ख्रिश्चनांचा समावेश असतो. समाजातील काही लोकांना आपल्याला इतरांवर हल्ले करण्याचा अधिकार असल्याचे दाखवतात.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. गोपाळ शेट्टी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात ख्रिश्चनांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. ख्रिश्चन समाजाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नव्हता, असे त्यांनी म्हटले होते. गोपाळ शेट्टी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यामुळे भाजपाच्या अडचणीत वाढ झाली होती. भाजपाचे मुंबईतील अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेट्टी यांना हे वादग्रस्त विधान मागे घेण्यास सांगितले होते. शेट्टींचे ते वैयक्तिक मत असून भाजपा त्यांच्या मताशी सहमत नाही, आम्ही ख्रिश्चन समाजाचा आदर करतो, असे शेलार यांनी सांगितले होते.

मुंबईतील पक्षनेतृत्वाने खडे बोल सुनावल्याने नाराज झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. मला पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे असून मी माझ्या विधानांवर ठाम आहे. मी स्वत:च राजीनामा देण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत