आंदोलनाचे नेतृत्व करणार नाही : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : रायगड माझा 

मराठा समाजाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मी करणार नाही, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. अलीकडेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व संभाजीराजे यांनी करावे, असे आवाहन केले होते. समाजाबरोबर रस्त्यावर उतरण्याची माझी तयारी आहे. आरक्षणाबाबत यापुढे सरकारसोबत बंद खोलीत नव्हे, तर आंदोलकांसमोर खुली चर्चाच झाली पाहिजे. संसदेच्या अधिवेशनात हा विषय येऊ दे, त्यावर प्रसंगी दिल्लीही हलवून सोडू, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दसरा चौकात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला रविवारी खा. संभाजीराजे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापुरात आंदोलन शांततेत सुरू आहे. यावरून कोल्हापूरकरांनी आपण आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचे खरे वंशज असल्याचे सिद्ध करून दाखवल्याचे सांगून संभाजीराजे म्हणाले, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. मी ही निवडणूक लढवू नये, अशीच इच्छा शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांची असावी. त्यानंतर मी राजकारणापासून दूर जाऊन महाराष्ट्राचा दौरा केला. शाहू महाराजांचा विचार राज्यभर पोहोचवला. 1902 ला महाराजांनी दिलेल्या आरक्षणात मराठा समाजाचाही समावेश होता. त्यांचा वंशज म्हणून मराठा समाजाचे नेतृत्व नाही, तर जनजागृती करण्यासाठी राज्यभर फिरलो.

ते म्हणाले, 2016 मध्ये राज्यभर मराठ्यांचे मोर्चे झाले, त्यांनी संयम, शांततेचा आदर्श घालून दिला. मराठा समाजाचे नेतृत्व मी करत नाही, तर हा समाजच स्वत:चे नेतृत्व करतो. तरीही मला मुंबईच्या मोर्चावेळी व्यासपीठावर जाण्याची विनंती केली. मी घाबरतच व्यासपीठावर गेलो आणि मी नेतृत्व घ्यायला नव्हे, तर समाजाची भूमिका मांडायला उभा असल्याचे सांगितले. त्याच दिवशी मी ठरवले की, कोणत्याही बंद खोलीच्या चर्चेला जाणार नाही, जी चर्चा होईल ती खुली, लोकांसमोर होईल.

यापुढे कोणत्याही चर्चेला मी नव्हे, तर मराठा समाजाचे बांधव जातील, असे सांगून संभाजीराजे म्हणाले, मी समन्वयाची भूमिका पार पाडेन. चर्चेसाठी मात्र या आंदोलनात बसलेले बांधव असतील. माझी खासदारकी ही बहुजन समाजासाठी आहे. दिल्लीत मी अर्धा तास मराठा समाजासाठी उभा होतो; पण राज्याचा एकही नेता तिथे आला नाही. राज्यसभेतही हा विषय मांडला. सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, ही भूमिका मी मांडली. हीच भूमिका घेऊन सर्व पक्षांचे लोक एकत्र येत आहेत, याचा मला आनंद आहे.

अधिवेशनही ओपन डोअर हवे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी होत आहे. हे अधिवेशनही क्लोज डोअर नको, तर ओपन डोअर असावे. एका बाजूला आरक्षण मागणारे, त्यातील तज्ज्ञ, तर एका बाजूला संसदेचे सभागृह असेच त्याचे स्वरूप असले पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

…अन्यथा स्वतः रस्त्यावर उतरणार 
या आंदोलनाचे नेतृत्व करणार नाही, ते समाजच करेल; पण मी सरकारला दोन गोष्टी सांगू शकतो. पहिल्यांदा या समाजातील बांधवांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घ्या; अन्यथा मी स्वतः रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा प्रश्‍न सोडवताना चर्चेसाठी तज्ज्ञांचा समावेश करावा, हेही मी सरकारला सांगणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

आपणही काठी घेऊ शकतो
कोल्हापूरने एक वेगळा आदर्श या आंदोलनात घालून दिला. कोल्हापुरात जो निर्णय होईल तोच सगळ्या राज्यात होईल. तुम्ही अजून काठी हातात घेतलेली नाही. कारण, आपण वाट बघतोय. योग्यवेळी काठीही हातात घ्यावी लागेल, आम्हाला गृहीत धरू नका, हाच संदेश तुम्ही दिला असूून, मी तुमच्या सोबत नेहमी असेन, मराठा समाजाने मला फक्त हाक द्यायची, मी धावून येईन, असे आश्‍वासन संभाजीराजे यांनी दिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत