आंदोलनात समाजकंटक: पोलिसांची धरपकड सुरू, मुंबईत 447 जणांना घेतले ताब्‍यात

मुंबई :रायगड माझा 

 मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्‍या मुंबई बंद दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून 447 जणांना ताब्‍यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्‍ह्यात बंद पुकारण्‍यात आला होता. यासोबतच राज्‍यभरात मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्‍यात आले. यादरम्‍यान दगडफेक व जाळपोळीच्‍या अनेक घटना घडल्‍या.

मुंबई बंद स्‍थगित केल्‍यानंतरही नवी मुंबई व ठाणे येथे आंदोलकांनी दगडफेक केली व रास्‍ता रोखून धरला होता. त्‍यानंतर सायंकाळी नवी मुंबईच्‍या मराठा क्रांती मोर्चाच्‍या आयोजकांनीही आंदोलनात समाजकंटक शिरल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला होता. त्‍यांनीच पोलिसांवर दगडफेक केली व वातावरण हिंसक बनवले, असा आरोपही त्‍यांनी केला होता.

याची दखल घेत आज मुंबई पोलिसांनी बंददरम्‍यान कायद्याचं उल्‍लघंन केल्‍याप्रकरणी 447 जणांना ताब्‍यात घेतल आहे. त्‍यांची आता याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.

आंदोलनाला हिंसक वळण लागण्‍याच्‍या भीतीने दुपारीच केला होता बंद स्‍थगित
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, मुंबईत 45 ठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे निदर्शने करण्‍यात आले. मुंबई, ठाणे, पालघर येथे बंद दरम्‍यान आंदोलक आक्रमक झाले होते. त्‍यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्‍हणून मुंबई मराठा क्रांती मोर्चाने दुपारी 3 वाजताच बंद स्‍थगित करण्‍याची घोषणा केली होती. मात्र त्‍यानंतरही नवी मुंबई व ठाणे येथे आंदोलकांकडून तुफान दगडफेक सुरू होती. यादरम्‍यान दोन पोलिसही जखमी झाले होते. तसेच साता-यातही एक पोलिस जखमी झाला होता.

सीसीटीव्‍हीच्‍या मदतीने करणार कारवाई
दंगलखोरांना अटक करण्‍यासाठी मुंबई पोलिस ठिकठिकाणच्‍या परिसरातील सीसीटीव्‍हीची मदत घेत आहेत. यासोबतच न्‍यूज चॅनेल्‍सकडील व्हिडिओ फुटेजही तपासले जाणार आहेत.

ठाण्‍यातही धरपकड सूरू
बंद दरम्‍यान ठाण्‍यात पोलिसांवर तसेच त्‍यांच्‍या वाहनांवरही आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्‍ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी 20 जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. तसेच आणखी काही जणांची धरपकड सुरू आहे, अशी माहिती ठाण्‍याचे पोलिस आयुक्‍त परमवीर सिंह यांनी दिली आहे.

बेस्‍टच्‍या अनेक बसेसचे नुकसान
मुंबईच्‍या मानखुर्द, दिंडोशी, गोरेगाव, कांदिवली येथे मोठ्या प्रमाणात वाहनांवर दगडफेक व तोडफोड करण्‍यात आली. इतकेच नव्‍हे तर बेस्‍टच्‍या अनेक बसेसना आगही लावण्‍यात आली. बंददरम्‍यान 23 बसेसचे नुकसान झाल्‍याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत