आंबेडकर यांनी आघाडीसोबत यावे; काँग्रेस-राष्ट्रवादीकडून संयुक्त आवाहन

मुंबई : रायगड माझा वृत्त

भाजपा-शिवसेना युतीच्या पार्श्‍वभूमीवर धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांमधील मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीसाठी घटक पक्षांकडे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला आहे. लोकसभेच्या बारा जागांवर अडून बसलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना चार जागा सोडण्याबरोबर आरएसएसला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या मुद्यावरही सहमती दर्शविण्यात आली आहे. आंबेडकर यांच्याकडून काय उत्तर येते त्यानुसार आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा आठवड्याभरात करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मागील निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकर अशी दोघांची मते एकत्र केली तर भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त मत होतात. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना राज्यभरात मिळणार प्रतिसाद विचारात घेता लोकसभेच्या चार जागा सोडण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. भाजपा विरोधी लढाईत लोकशाहीवादी व संविधानवादी राजकीय पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता असून आंबेडकर यांनी आघाडीसोबत यावे, असे संयुक्त आवाहन काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान भाजपा विरोधातील महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभेच्या कधीही न जिंकलेल्या 12 जागा देण्याची मागणी आंबेडकर यांनी केली होती. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी चार जागांची मागणी केली होती. यामुळे आंबेडकर व शेट्टी यांच्याशी आघाडीच्या नेत्यांचा संवाद थांबला होता. भाजपा-शिवसेना युतीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा विरोधातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी एक पाऊल मागे घेत काँग्रेस-राष्ट्रवादीने समविचारी पक्षांशी पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक तर काँग्रेसच्या कोट्यातून एक अशा दोन जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत