आईच्या प्रियकराकडून अमानूष मारहाण, चिमुकल्याचा घेतला जीव

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन  

आई घरात नसल्यामुळे रडत असलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याला त्याच्या आईच्या प्रियकराने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या कापसहेडा भागात घडली आहे. युआन सुर्यप्रताप सिंह असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी नराधम प्रियकराने युआनला रुग्णालयात नेऊन लाडू खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवाल युआनच्या हत्येचा उलगडा झाला.

युआनचे वडील सुर्यप्रताप सिंह आणि राणी सिंह यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. 2013 मध्ये त्यांच्या पोटी युआन जन्मला. युआनची आई राणी एका शाळेत शिक्षिका होती. तिचे त्याच शाळेत कार्यरत असलेल्या नरेंद्र सोबत प्रेम संबंध जूळले. त्यामुळे सुर्यप्रताप आणि राणी यांच्यातील संबंध दूरावले. काही दिवसांनी राणीने सुर्यप्रतापला सोडले आणि युआनला बरोबर घेऊन ती नरेंद्र सोबत राहू लागली. याच काळात राणीची नोकरीही गेली. त्यामुळे राणी युआनला घरी ठेऊन नोकरीच्या शोधात फिरत होती. नरेंद्र युआनला घरी सांभाळत असे त्याचसोबत तो त्याचा अभ्यासदेखील घ्यायचा. मात्र 10 जानेवारी रोजी आई घरी नव्हती आणि अभ्यासादरम्यान युआनकडून काहीतरी चूक झाल्याने तो रडू लागला. नरेंद्रला युआनच्या रडण्याचा राग अनावर झाला. त्याने युआनला निर्दयपणे बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

युआनचा मृत्यू झाल्याने घाबरलेल्या नरेंद्रने लाडू खाल्ल्याने युआनची प्रकृती बिघडल्याचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी युआनचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी संशयावरून नरेंद्रला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत