आगामी निवडणुकीत वंचितांची सत्ता – प्रकाश आंबेडकर

 

जेजुरी (जि. पुणे) : रायगड माझा वृत्त

महाराष्ट्रात अनेक समाज अजूनही उपेक्षित आहेत. त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. मागणी, आंदोलन करूनही आरक्षण मिळत नाही. सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे यापुढे आरक्षण मागत बसायचे नाही, तर आगामी निवडणुकीत वंचित घटकांची सत्ता आणायची आणि त्यानंतर आपले प्रश्न सोडवायचे, असा निर्धार भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

जेजुरीत आरक्षण एल्गारसाठी दसरा मेळावा आयोजित केला होता, त्या वेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. या वेळी खासदार राजू शेट्टी, नवनाथ पडळकर, ॲड. विजय मोरे उपस्थित होते. पूर्वीचे कामे करून खात होते, आत्ताचे कामे न करताच खातात. लोकशाही संपवून देशात हिटलरशाही आली आहे आणि आता मनुवाद आणण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यामुळे भाकरी वेळीच पालटली पाहिजे. मात्र, पालटताना ती वंचितांच्या हातात राहिली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

सनातनवाल्यांच्या हातात शस्त्रे कशी याची उत्तरे सरकार देऊ शकत नाही. राज्यात, देशात अशांतता व असुरक्षितता निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. मागील निवडणुकीच्यावेळी बारामतीत आरक्षण देण्याचे आश्वासन याच सरकारने दिले होते. आरक्षणावरून समाजासमाजांत भांडणे लावली जात आहेत. ते सर्वांना एकत्र येऊ देत नाहीत. धनगर-आदिवासींना एकत्र बसवून प्रश्न सोडविले पाहिजेत. मात्र वाद लावून प्रश्न बाजूला ठेवले जातात, असे आंबेडकर म्हणाले.

सध्याच्या सरकारने आश्वासनांशिवाय काही दिले नाही
आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा देखावा करतात. चित्र बदलायचे असेल तर सर्व एक झाले पाहिजेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरतोय. खात्यात कोणती माणसे बसविली आहेत ते पाहिले पाहिजे. शेतकरी अद्यापही कर्जात आहे. सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत.
– राजू शेट्टी,  खासदार 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत