आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा- अजित पवार

हिंगोली : रायगड माझा वृत्त 

सध्या राज्यात सर्वत्र सरकारच्या विरोधामध्ये रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंगोलीच्या शिष्टमंडळाला दिल्या आहेत.

हिंगोली येथील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिपावलीनिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, बार कौन्सील ऑफ इंडियाचे पदाधिकारी अॅड. सतिष देशमुख, बाबू कदम पहेलवान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चव्हाण यांनी अजितदादा पवार यांचा सत्कार केला. यावेळी अजित पवार यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा करून हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कामकाजाची माहिती घेतली. सध्या केंद्र व राज्य शासनाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच योजना फसव्या निघाल्यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावपातळीवर जाऊन गावकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावीत व त्याची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या. आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे आतापासूनच नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष या नात्याने दिलीप चव्हाण यांनी सर्व नियोजनाची माहिती वेळोवेळी द्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत