आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही याविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

मुंबई: रायगड माझा वृत्त

गोरेगाव येथे रविवारी पार पडलेल्या भाजपच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनात युतीबाबत ठोस घोषणा झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिलेले असल्यामुळे काहीही झाले तरी युती नक्की होणारच, असेही अनेक नेते व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सोमवारी अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये रविवारी झालेल्या या बैठकीतील भाषणांबाबतच चर्चा सुरू होत्या.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोपर्यंत युतीला धक्का पोहोचविण्याबाबत वक्तव्य होत नाही तोवर थेट प्रतिक्रिया द्यायची नाही, असे शिवसेना नेतृत्वाने ठरविले असल्याचेही कळते. राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर लढण्याची तयारी करण्याचा सूर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विशेष कार्यसमितीच्या बैठकीत रविवारी लावला. तर, याच बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपण मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही याविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात युतीचे संकेत दिले असले तरी, नड्डा आणि पांडे यांच्या भाषणामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होणार की नाही याबाबत भाजप कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. दुसरीकडे, शिवसेनेने देखील सावध पवित्रा घेत, भाजपने पुन्हा मागचाच हातखंडा अवलंबला तर ऐनवेळी दगाफटका होऊ नये यासाठी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राज्यातील सर्व जागा लढविण्याबाबत गांभीर्यानं चाचपणी सुरू केली आहे. 

समजा २०१४ प्रमाणेच काही घडले आणि युती झाली नाही, तर काय चित्र राहील? राज्यातील कुठल्या विभागात भाजपला चांगले यश मिळेल? तसेच कुठल्या विभागात भाजपला अधिक कठोर परिश्रम घ्यावे लागतील याबाबत अनेक नेते व कार्यकर्ते यांच्यात चर्चा सुरू होती.  भाजपच्या विशेष कार्यसमितीच्या बैठकीत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे आणि जिथे मित्रपक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजपच निवडणूक लढत आहे असे समजून सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहोत असे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सावध पवित्र घ्यायला सुरुवात केली आहे.

शिवसेना नेतृत्वाचा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यादृष्टीने संवाद सुरू असून मागच्या विधानसभेप्रमाणे यावेळी देखील स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आल्यास काय करता येईल याबाबत चाचपणी करण्यात येत असल्याचे कळते.  मात्र गेल्यावेळी ऐनवेळी युती तुटल्याने उमेदवारांची निवड करताना जशी धावपळ उडाली तशी परिस्थिती यावेळी येऊ नये म्हणून राज्यात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याबाबतची चाचपणी करण्यात येत असल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत