आजची साडी उद्याची बॅग!

 

खारघर : रायगड माझा वृत्त 

साड्या हा बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय. इतकी विविधता त्यामध्ये असते की मन भरत नाही. पण काही काळाच्या वापरानंतर याच साड्या टाकून दिल्या जातात. काही वेळा त्या देऊन भांडी घेतली जातात; तर काही जणी पायपुसण्यासाठी त्यांचा वापर करतात. पण “आजची साडी, उद्याची बॅग’ असे ब्रीदवाक्‍य बनवून युवाशक्‍ती नामक एक गट काम करतो आहे.

मुंबईतील खारघर इथल्या युवाशक्ती या स्त्रियांच्याच गटाने जुन्या साड्यांपासून पिशव्या बनवायला सुरुवात केली. स्थानिक फेरीवाले आणि वितरकांकडे त्या विक्रीस द्यायला सुरुवात केली. स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचललेले हे पुढचे पाऊल आहे आणि ते पर्यावरणपूरकही आहे हे महत्त्वाचे !
स्त्रियांना सक्षम बनवायचे असाच खारघरच्या युवाशक्ती गटाचा उद्देश. त्यासाठी स्त्रियांच्या हाताला काम आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांना एक शाश्‍वत पर्याय देणे हे त्यांचे उद्दीष्ट होते. या स्वप्नाचा पाठलाग करत असतानाच जून 2005 मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर प्लॅस्टिकच्या पातळ पिशव्यांवर बंदी आली. तरीही दरवर्षी पाण्याच्या पाईपलाईनमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या अडकून सांडपाणी तुंबून रस्त्यावर वाहणे नेहमीचेच झाले होते. युवा नावाच्या एका बिगर शासकीय संस्थेनेविनाकारण वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे निर्माण होणारा कचरा यावर “स्टोरी ऑफ स्टफ’ नामक एका लघुचित्रपटाची निर्मिती केली. याच संस्थेची एक उपकंपनी असणाऱ्या युवाशक्तीने मग जुन्या साड्यांपासून पिशव्यांची निर्मिती करायची ठरवली.
युवाशक्तीच्या सदस्या असणाऱ्या इंदुमथी कुमार सांगतात की, या प्रकल्पाचे नाव होते प्लॅस्टिकच्या पिशव्या टाळा. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळणे आणि पिशव्या शिवण्यातून नफा मिळवणे हा या मागचा उद्देश होता. आमच्या गटातील अनेक महिलांना काही ना काही कारणाने घरीच बसावे लागत होते. पण त्यांना काहीतरी काम करुन घराला हातभार लावण्याची इच्छाही होती. खारघरमध्ये प्लॅस्टिक बॅग्जच्या वापरासंबंधीच्या सर्वेक्षणापासून या मोहिमेची सुरुवात केली. या गटाच्या सदस्यांनी सुपरमार्केट आणि फेरीवाल्यांशी बोलून दिवसभरातील पिशव्याची गरज जाणून घेतली. तिथे दिवसाला जवळपास पाचशे ते हजार पिशव्या लागतात.
त्यानंतर या सर्व महिलांनी प्लॅस्टिक कॅरीबॅगला येणारा खर्च विचारात घेतला. पातळ प्लॅस्टिकच्या 50 बॅगचे पाकीट 40 रुपयांना पडते असे त्यांना समजले. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर प्लॅस्टिक बॅगच्या किमतीत त्यांनी साडीपासून बनवलेल्या पिशव्या सुपरमार्केटच्या मालकांना विकण्यास राजी केले. यानंतर साड्या गोळा करून या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली आहे. खारघरमधील बचत गटांच्या महिलांकडून हजार बॅगा शिवून घेतल्या जाणार आहेत. या प्रकल्पाला यश मिळाले तर खारघर बाहेरही अशाप्रकारे पुढाकार घेऊन काम सुरु करण्याचा युवाशक्तीचा मानस आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत