आजपासून दूधकोंडी

शेतकरी संघटना शहरांचा पुरवठा रोखणार

पुणे:रायगड माझा 

खासगी व सहकारी दुध संघांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना तीन रुपये दर वाढीव दर देण्याचे मान्य केले असल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे अशा प्रकारचे कुठलेही अधिकृत पुरावे आलेले नाहीत, दुध आंदोलनात फुट पाडण्यासाठी दुध संघ व राज्य शासनाकडून जाणूनबूजून प्रयत्न सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे आज पहाटेपासून सुरु करण्यात आलेले दुध बंद आंदोलन कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे.

राज्य सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरला पाच रुपयांचे अनुदान जोपर्यत जाहीर करीत नाही तोपर्यंत मुंबईची चार बाजूंनी दुधकोंडी निश्‍चित आहे. मुंबई हे लक्ष असले तरी राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्येही त्याचा फरक पडणार आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

गुजरातसह नाशिक पट्टा, अहमदनगर, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या दुधाचा एक थेंबही मुंबईला पोहचणार नाही अशा पद्धतीने आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. कर्नाटकांतील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. वसई-विरार पट्यात गुजरातमधील दुध आम्ही येऊ देणार नाही. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा फटका हा पुणे शहरातील दुध पुरवठ्यावर सुद्धा पडू शकतो. कारण पुण्यात सुद्धा पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर दुध येत असते. गोकूळने या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याने त्यांचे दुध पुण्यात येणार नाही, त्याचबरोबर चितळे दुध हे जरी खासगी असले तरी ते पश्‍चिम महाराष्ट्रातून येत असते. त्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडून गाड्या अडविण्याचे प्रकार होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर दुधाची आवक कमी होऊ शकते. कात्रज दुध संघाला सुद्धा या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दुध संकलन कमी होऊन विक्रीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्षात कशाप्रकारच्या अडचणी येतील हे आंदोलन सुरु झाल्यावरच समजू शकेल, असेही पुण्यातील दुध विक्रेत्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले आहे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

दुधाचा टँँकर पेटवला

अमरावती येथील वरुड परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरला जाणारा दुधाचा टॅंकर फोडून पेटवून दिला. दुधाला 5 रुपये प्रतिलीटर अनुदान द्या आणि प्रत्येक तालुक्‍यात मदर डेअरी केंद्र सुरू करा, या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये दररोज 20 लाख लिटर अतिरिक्त दुध उत्पादन होते. याची योग्य विल्हेवाट लावली तर दुध खरेदीचा भाव 27 ते 28 रूपयापर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी सरकारने दररोज 20 लाख लिटर दूध स्वत: खरेदी करावे. यासह इतरही अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानीचे विदर्भप्रमुख देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.


शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत