आज शुक्रवार, आज पुन्हा चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल !

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for camera pop corn

आज शुक्रवार, आज पुन्हा चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल होतायत. यात दोन हिंदी आणि दोन मराठी सिनेमांचा समावेश आहे. आज रिलीज झालेला पहिला सिनेमा आहे अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री हा सिनेमा. अब मर्द को दर्द होगा या टॅगलाईनसह रिलीज होणाऱ्या या सिनेमात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका आहे. कॉमेडी हॉरर या प्रकारातला हा सिनेमा प्रेक्षकांना कितपत आवडतो याची उत्सुकता आहे.

आज रिलीज झालेला आणखी एक  सिनेमा आहे यमला पगला दिवाना फिर से. यमला पगला सीरिजचा हा तिसरा सिनेमा. यातही धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसतील.  पंजाबी असलेले हे तिघे गुजराती बनून काय धमाल करतात ते या सिनेमात पहायला मिळेल.

मराठीत आज रिलीज झालेला  सिनेमा आहे महेश मांजरेकरांची निर्मिती असलेला टेक केअर गुड नाईट. गिरीश जोशी लिखित दिग्दर्शित हा सिनेमा सायबर क्राईमसारख्या विषयावर आधारित आहे. सायबर क्राईमच्या घटनेला एक कुटुंब कशा पद्धतीने तोंड देतं ते या सिनेमात आपल्याला पहायला मिळेल. सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे आणि आदिनाथ कोठारे हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

आणखी एक मराठी सिनेमा आहे सविता दामोदर परांजपे. याच नावाच्या नाटकावर आधारित असलेल्या या सिनेमात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. नाटकाएवढाच सिनेमा यशस्वी होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

एकूणच सगळेच सिनेमे दमदार आहेत. त्यामुळे सिने रसिकांना सिनेमा  बघायचं खास वेळापत्रक आखावं लागेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत