हजारीबाग :रायगड माझा
दिल्लीत एकाच कुटुंबातील 11 जणांच्या आत्महत्येचे वृत्त ताजे असतानाच झारखंडमध्ये आणखी एक सामूहिक आत्महत्येची घटना समोर आली आहे. झारखंडच्या हजारीबाग येथे रविवारी सकाळी एका फ्लॅटमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत. मृतांमध्ये 2 पुरुष, 2 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. याच फ्लॅटच्या खोलीत तीन लिफाफे सुद्धा सापडले आहेत. त्यावर आर्थिक दिवाळखोरी आणि कुप्रसिद्धीच्या भितीने आत्महत्या करत असल्याचे लिहिण्यात आले आहे. परंतु, त्या लिफाफ्यांच्या आत असलेल्या लेटर्समध्ये नेमके काय हे अद्याप समोर आले नाही.
अपार्टमेंटखाली सापडला नरेशचा मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर यांचे हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हजारीबागमध्ये राहत होते. येथील सीडीएम अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांचे फ्लॅट होते. त्यांचा मुलगा नरेश हजारीबागेत सुक्या मेव्याचा व्यापारी होता. नरेश डिप्रेशनमध्ये होता. त्याचा चुलत भाऊ देवेश अग्रवालने सांगितले, की रांची येथे त्याच्या डिप्रेशनवर उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वीच हा कुटुंब तीर्थ यात्रेवरून परतला होता. नरेशचा मृतदेह अपार्टमेंटच्या खाली सापडला आहे.
मार्केटमध्ये अडकले होते 50 लाख रुपये
शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रविवारी सकाळी अपार्टमेंटच्या खाली नरेशचा मृतदेह सापडला. शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच परिसरात गर्दी झाली. लोक पळत त्याच्या फ्लॅटमध्ये गेले तेव्हा दार उघडेच होते. आत पाहिल्यावर लोकांना मोठा धक्का बसला. फ्लॅटमध्ये उर्वरीत कुटुंबियांचे, आणखी 5 मृतदेह दिसून आले. देवेशने सांगितल्याप्रमाणे, नरेशचे 50 लाख रुपये मार्केटमध्ये अडकले होते. ते परत मिळतील याची शक्यता खूप कमी होते. अशात नरेश कर्जबाजारी झाला होता.
लिफाफ्यांवर काय?
गणिताच्या सूत्राप्रमाणे लिफाफ्यावर आत्महत्येचे कारण सांगण्यात आले आहे. यातील एका लिफाफ्यावर, आजारपण+दुकान बंद+दुकानदारांचे कर्ज+बदनामी+कर्जामुळे ताण = मृत्यू असे लिहिले. तर दुसऱ्यावर अमनला लटकवू शकलो नाही, त्यामुळे त्याचा खून केला. अमन नरेशच्या मुलाचे नाव होते.