आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

पुणे: रायगड माझा वृत्त 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे त्यात आता धनगर समाजानेही उडी घेतली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून पृथ्वीराज चव्हाण असो किंवा देवेंद्र फडणवीस असो सरकारने आमची फसवणूक केली आहे असा आरोप करत 1 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या नाहीतर आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशारा भाजपमधील धनगर नेत्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात 1 ऑगस्टला सभा तर औरंगाबादमध्ये 1 सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षापासून घटनादत्त आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे.  2014 साली राज्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतू, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा धनगरांना आरक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा आरोप उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

गेल्या तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, आदिवासी मंत्रालय यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड आढळून आला नाही. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93 हजार धनगड, तर एकूण 19 लाख 50 हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत. यावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 9.5 आमदार, तर 30 टक्के अनुदान आणि 30 टक्के नोकऱ्या या इतर समाजाच्या बोगसगिरी करुन हडपल्या आहेत, त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार आणि बोगस लाभधारक तर नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.

राज्यातील धनगर समाजाची एकच मागणी आहे. ते म्हणजे धनगर’र’ चे धनग’ड’ झालं आहे. त्यामुळे देशातील अन्य राज्यांप्रमाणे ते दुरुस्त करावे. मात्र, आघाडी सरकराच्या काळात खा. भाऊसाहेब वाकचोरे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात ‘र’ च ‘ड’ झालेले नसून धनगर व धनगड या भिन्न जाती आहेत. त्यांच्या चालीरिती रुढी पंरपरा, देवदेवता वेगळे असल्याची खोटी माहिती दिली. तसेच मंबई उच्च न्यायालयात मधु शिंदे यांनीही दाखल केलेल्या याचिकेवर सरकारकडून आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर आणि धनगड या भिन्न जाती आहेत. त्यामुळे या दोघांवर संसदेची आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी, तसेच धनगर समाजाची फसवणूक केल्याप्रकणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली.

समस्त धनगर समाजाच्या वतीन सरकारला हा अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी धनगड दाखवावा अन्यथा 1 सप्टेंबर 2018पूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचा दाखला द्यावा, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत