आता जे होईल त्याला सरकार जबाबदार – मराठा मोर्चा

उस्मानाबाद  : रायगड माझा 

राज्यात मराठा क्रांती मोर्चाने शांततेत आंदोलन केले. आता यापुढे तसे होईलच असे नाही. आता जे घडेल आणि बिघडेल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा मराठा मोर्चाने तुळजापूर येथे दिला. त्यामुळे यापुढे मराठा क्रांती मोर्चाकडून अधिक तीव्र आंदोलन होण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करणार का, याकडे लक्ष लागलेय.

मराठा क्रांती मोर्चाने आतापर्यंत राज्यात शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले. मात्र, आश्वासनापलिकडे काहीही मिळालेले नाही. सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाज शांत असला तरी वेळ आल्यावर बंड करण्याची धमक आहे, असे इशारा दिलाय. तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ पहाच ! याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल, अशा तीव्र शब्दात मराठा समाजाने सरकारला निर्वाणीच्या भाषेत समजावलेय.

आपल्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी तुळजापुरातून करण्यात आली. राज्याच्या विविध भागातून आलेल्या मोर्चेकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात केली. तेथून थेट तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावर हा मोर्चा धडकला. याठिकाणी हजारो मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितीत जागरण-गोंधळ घातला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे समाजाची दिशाभूल करीत आहेत. दहा महिने उलटले तरी त्यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नाही. शिवरायांनी स्वराज्यासाठी जी गनिमी काव्याची नीति वापरली होती, त्याच नीतिने पुढची आंदोलने होतील. त्यात जे काही घडेल-बिघडेल त्यास पूर्णपणे सरकारच जबाबदार राहील आरक्षण हा आमचा हक्क आहे. तो घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांनाही आता इंगा दाखवू, या शब्दांत अनेकांती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत