आदिवासी वाड्यांत काळा पाऊस; भातशेती, भाजीपाला पीक धोक्यात

नागोठणे : पूर्वेकडील आदिवासी वाड्यांमध्ये शुक्र वारी दुपारी पाऊस पडताना पावसाच्या पाण्याबरोबर काळ्या रंगाचे रसायन खाली पडल्याचा प्रकार घडला आहे. हे रसायन नक्की कोठून आले याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी साचलेल्या काळ्या रसायनामुळे भातशेती तसेच भाजीपाला पीक नष्ट होईल अशी भीती आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे. याबाबत संबंधित पाण्याची तसेच साचलेल्या फेसाची येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे पर्यावरण व जलतज्ज्ञ प्रा. डॉ. विलास जाधवर यांनी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, आम्ही पाच चाचण्या केल्या असून त्यातील तीनमध्ये दोष आढळून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केलेल्या चाचणीत पाण्याचा रंग काळसर आढळून आला असून त्यात ६.०५ आम्ल गुणधर्मी पाणी असल्याचे दिसून येत आहे.
काळा पाऊस पडून एक दिवस उलटून गेला तरी विहिरीतील पाणी रविवारीही काळेच दिसत होते. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा गाळ खाली बसल्यानंतर रसायनमिश्रित काळ्या रंगाचा थर खाली बसला असल्याने भातशेतीला ते धोकादायकच असून तयार झालेल्या भाजीपाल्याला सुद्धा याचा फटका बसणार असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडा, रामा बरतूड, चंद्रकांत हंबीर, कमलाकर बांगारा यांनी सांगितले. मोरू हंबीर, महादू निरगुडा, संतोष भला आणि आदिवासी महिलांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात सुद्धा एकदा असा पाऊस पडला होता. वांगी, शिराळी, कारली, मिरची, काकडी, पडवळ, भेंडी आदी भाज्यांचे पीक आम्ही घेत असून त्यावेळी पडलेल्या काळ्या पावसामुळे केलेले बहुतांशी पीक नष्ट झाले होते व प्रत्येक शेतकºयाला २० ते ४० हजार रु पयांचे नुकसान सोसावे लागले होते असे त्यांनी स्पष्ट केले.
या भागात फेरफटका मारला असता, ढोकवाडीतील ग्रामस्थांना त्याचा जास्त फटका बसला असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावालगत एक विहीर असून विहिरीच्या पाण्यावर सुद्धा काळ्या रंगाचा तवंग साचला असून उन्हाळ्यात यातील पाणी जलवाहिनीद्वारे परिसरातील आदिवासीवाड्यांवर पुरवले जाते. पावसाळ्यात बहुतांशी कुटुंबे पावसाच्या पागोळीचे पाणी गाळून घरात वापरत असतात व उणीव भासल्यास संबंधित विहिरीचे पाणी आणत असतात असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. शुक्र वारी सकाळी पाणी भरले असून आता सगळीकडेच काळे पाणी साचल्याने आमच्या मुलाबाळांसाठी आता पाणी तरी कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.
परिसरातील एखाद्या कारखान्यामधूनच हे प्रदूषण झाले असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सरकारी यंत्रणेने याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील पूर्वेकडील डोंगरावर वासगाव, कातकरवाडी, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्ह्याची वाडी आदी आदिवासीवाड्या आहेत. येथील आदिवासींचा भाजीपाला पिकवून विकण्याचा मुख्य व्यवसाय आहे, तर धनगर समाज दुग्ध व्यवसाय आणि भातशेती करतात. शुक्र वारी दुपारी पाऊस पडल्याने सुरु वातीला उग्र वास आला, त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर पडलेले पाणी काळे असल्याचे निदर्शनास आले असे वासगाव येथे राहणारे पाटणसई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच झिमाशेठ कोकरे, काशिनाथ हंबीर व इतर आदिवासी बांधवांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत