आपत्तींच्या मुकाबल्यासाठी सुसज्ज व्यवस्था निर्मिती करणार-पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण

अलिबाग : रायगड माझा वृत्त 

रायगड माझा वृत्त रायगड जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचाव कार्यासाठी सुसज्ज व्यवस्थानिर्मितचे शासनाचे प्रयत्न असून लवकरच एन.डी.आर.एफ च्या धर्तीवर जिल्ह्यात सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण होईल, अशी घोषणा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केली. 

ना. चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचाव साधनांच्या उपलब्धतेसाठी तातडीने 30 लाख रुपये देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित या शानदार समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवतीकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीधर बोधे, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या सह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगान होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ना. चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. ते म्हणाले, विविध लोकाभिमुख योजना राबवून महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण जनता, महिला या सर्व घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनानेप्रामाणिक प्रयत्न चालवला आहे. विकासाचा समतोल साधण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे वर्षभरातच निवडलेल्या 56 गावांमध्ये सामाजिक परिवर्तन दिसून आले, याबद्दल ना. चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 18 हजार 73 शेतकऱ्यांना 41 कोटी 7 लाख 27 हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. तर 19356 नियमित कर्जफेड करणाऱा शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत 1 कोटी 91 लाख 26 हजार रुपयांच्या व्याज सवलतीचा लाभ देण्यात आला. या कर्जमाफीमुळे या वर्षीच्या खरीप हंगामात कर्ज घेण्यासाठी अनेक शेतकरी पात्र ठरले. यावर्षी 25 हजार 579 शेतकऱ्यांना तब्बल 129 कोटी 85 लाख 17 हजार रुपयांचे खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले आहे, हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करणारे शासन आहे, असा विश्वास ना. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

‘माहितीदूत’ उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ते पुढ़े म्हणाले की, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान यासारख्या योजनांमुळे कृषि उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी मुद्रा बॅंक योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत 5233 जणांना 64 कोटी 89 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी देण्यात आले. जिल्ह्यातील जनतेला ऑनलाईन दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. स्वस्त धान्य दुकानात पॉईंट ऑफ सेल ( पीओएस) मशीन द्वारे धान्य वितरणास सुरुवात झाली आहे, याबद्दलही ना. चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, साऱ्यांचे सहकार्य व समन्वयाने जिल्हा लवकरच कुपोषण मुक्त होईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत