आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर सार्वजनिक करु नका- UIDAI

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय (Trai) चे चेअरमन आर एस शर्मा यांच्या अंगलट आल्यानंतर UIDAI ला जाग आली आहे. कारण, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर सार्वजनिक करु नका, असं आवाहन UIDAI कडून करण्यात आलं आहे.

UIDAI कडून नागरिकांनी आपला १२ अंकी आधार क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. आधारक्रमांक शेअर करणं चुकीचं आहे, असं करणं कायदेशीरही नाहीये. नागरिकांनी स्वतःही आधार क्रमांक शेअर करु नका आणि इतरांनाही करु देऊ नका. याशिवाय आधार क्रमांकाबाबत कुणाला चॅलेंजही करु नका असं UIDAI ने म्हटलं आहे.

या सर्व प्रकरणाची सुरूवात दोन दिवसांपूर्वी आर एस शर्मा यांनी आधार क्रमांक (Aadhaar number) सार्वजनिक केल्यानंतर झाली. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा केला होता. आपल्याला यामुळे कोणतीही हानी होऊ शकत नाही. तसे असेल तर हॅक करुन दाखवा, असं चँलेंजच शर्मा यांनी नेटिझन्सना दिलं होतं. त्यानंतर अनेक हॅकर्सनी शर्मा यांच्या गोपनीय माहिती मिळवल्याचा दावा केला. इलियट अँडरसन या फ्रान्सच्या सुरक्षा तज्ज्ञाने तर शर्मा यांची बरीच गोपनीय माहिती उघड केली.

एथिकल हॅकर्स या ग्रुपने तर थेट शर्मा यांचे बॅंक डिटेल्स मिळवून पेटीएम आणि भिम अॅपद्वारे १ रुपया पाठवल्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला. त्यानंतर एक दिवसापूर्वीच त्यांच्या मुलीलाही इ-मेलद्वारे धमकी मिळाली असून खंडणीची मागणी करण्यात आली आहे. धमकीच्या इ-मेलमध्ये, ‘शर्मा यांचं इ-मेल अकाउंट हॅक झालं आहे आणि त्यांचं पंजाब नॅशनल बॅंकेचं खातंही लवकरच हॅक होण्याचा धोका आहे. सोशल मीडियावर चॅलेंज देऊन शर्मा यांनी हॅकर्सना निमंत्रण दिलं आहे आणि देशाची मान शरमेने झुकवली आहे. जर शर्मा यांनी त्यांचं अकाउंट डिलीट केलं नाही तर त्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स सार्वजनिक करु, तसंच त्यांच्या फोनमध्ये व्हायरस सोडला जाईल. २४ तासांमध्ये इ-मेलला उत्तर नाही तर परिणाम भोगायला तयार राहा’ असं म्हटलंय. इ-मेलमध्ये खंडणीची मागणीही करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत