आमदार व्हायचंय मला … पैलवानाची शरद पवारांना साद 

महाराष्ट्र News 24 वृत्त

आमदार व्हायचंय मला … शरद  पवारांना अशी  साद  घालत चंद्रहार पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यातून थेट विधान परिषदेच्या आखाड्यात उडी मारली आहे.  विधान परिषदेच्या बारा जागांपैकी एक जागा कुस्ती क्षेत्रातील पैलवानाला मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीत चंद्रहार पाटील यांनी विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केल्याचे समजते. या भेटीत नेमके काय घडले याचा तपशील समजला नाही मात्र, त्यांची भेट झाल्याचेसमोर आले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विधान परिषदेच्या जागेसाठी चंद्रहार पाटील भेटले तसेच ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांनाही भेटल्याचे समजते. या भेटीदरम्यानही त्यांनी विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी केल्याचे वृत्त आहे. चंद्रहार पाटील हे सांगली जिल्ह्यातील भाळवणी गावचे रहिवासी आहेत. ते आळसंद जिल्हा परिषद गटातून सांगली जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. जिल्हा परिषदेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव दादा पाटील यांचा आळसंद जिल्हा परिषद गटातून धक्कादायक पराभव केला होता.

या विजयानंतर चंद्रहार पाटील यांची सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होती. चंद्रहार यांनी औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे  झालेल्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनात महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. चंद्रहार  पाटील हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जातात. तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना आमदारकी मिळणार काय? याची चर्चा कुस्ती क्षेत्रात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत