आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात वाजते धोक्‍याची घंटा

भारतीय जनता पक्षाने पसरले हातपाय:कॉंग्रेसच्या अस्तीत्वावर प्रश्‍नचिन्ह

कोरेगाव: रायगड माझा

कोरेगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीतूनच शशिकांत शिंदे यांच्या विरोधात कोरेगावात व्युहरचनेला प्रारंभ झाला आहे. देशात आणि राज्यात भक्कम पाय रोवलेले भारतीय जनता पार्टीचे कमळही दिवसेंदिवस फुलू लागले असतानाच पहिल्या क्रमांकावर असलेला कॉंग्रेस पक्ष सध्या अस्तित्वच गमावून बसला आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या उदासिन पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेना नावापुरतीच बोर्डावर उरली आहे. दरम्यान, सध्या कोरेगाव विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या राजकीय हालचालींमूळे आगामी काळात शशिकांत शिंदे यांच्यासाठी धोक्‍याची घंटा वाजू लागली आहे.

कोरेगाव विधानसभा मतदार संघात माजी आमदार कै. शंकरराव जगताप यांनी पंचवीस वर्षे कॉंग्रेसची धुरा संभाळली होती. त्यांच्या काळात कॉंग्रेस पक्ष कायम प्रथम क्रमांकावर होता. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस पक्षाशी फारकत घेवून नव्याने राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. व त्यांच्या पक्षाच्यावतीने माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी शंकरराव जगताप यांचा मोठ्या मताने पराभव करून कोरेगाव विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचे अस्तित्व वाढवले. राष्ट्रवादी पक्षातून दोनवेळा आमदार झालेल्या शालिनीताई पाटील यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातच भूमिका घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात ताईंच्या बद्दल नाराजी पसरली. त्याचबरोबर 2009 मध्ये कोरेगाव विधानसभा मतदार संघाची रचना बदलल्याने मतदार संघ सातारा, कोरेगाव व खटाव तालुक्‍यात विभागला गेला. पूर्वीचा जावली मतदार संघ रद्द होवून जावली संघात समावेश असलेली सातारा तालुक्‍यातील काही गावे कोरेगाव विधानसभा मतदार संघाशी जोडली गेली. त्यामुळे शालिनीताई पाटील यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने जावली मतदार संघाचे आमदार शशिकांत शिंदे यांना शालिनीताई पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दिली. यावेळी कोरेगाव तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारालाच उमेदवारी द्यावी, असा सुर होता. या कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून शालिनीताई पाटील यांचा पराभव करण्यासाठी शशिकांत शिंदे हाच योग्य उमेदवार समजून त्यांना उमेदवारी दिली. आ. शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून सातारा, कोरेगाव व खटाव तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून शालिनीताई पाटील यांचा मताधिक्‍याने पराभव केला. मोठ्या विजयाने निवडून आलेल्या आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदार संघात पंचतारांकीत औद्योगिक वसाहत उभी करणार, वैद्यकिय-इंजिनीअरिंगसह विविध अभ्यासक्रमावरचे शैक्षणिक संकुले उभी करणार, जिहे-कठापूर, वसना-वांगना, उपसासिंचन योजना पूर्ण करणार, कोरेगाव-पुसेगावसह मतदार संघातील अनेक मोठी गावे, शहरे स्मार्ट सीटी बनवणार, विविध शहरात भुयारी गटर योजना, अशी अनेक आश्वासने 10 वर्षाच्या काळात जनतेला दिली. परंतु, आत्तापर्यंत एकही आश्वासन पुर्ण केले नाही. याउलट खा. लक्ष्मणराव पाटील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत राजकारण करत असल्याचे कारण पुढे आले. कोरेगाव तालुक्‍यातील राष्ट्रवादी पक्षाचा एक मोठा गट आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उतरला असून यापुढे स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशा प्रकारची मागणी करत आहे. सुरूवातीला चाळीस पन्नास कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या मागणीला कोरेगाव तालुक्‍यातील शे-पाचशे कार्यकर्ते यात समाविष्ट झाले. दिवसेंदिवस आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उभ्या केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे.
कोरेगाव तालुक्‍यात कायम चाळीस वर्षे प्रथम क्रमांकावर असलेला कॉंग्रेस पक्ष अंतर्गत गटबाजीमुळे संपुष्टात येवू लागला आहे. माजी आ. कै. शंकरराव जगताप यांच्या नंतर कोरेगाव तालुक्‍यात कॉंग्रेसचे जि. अध्यक्ष आ. आनंदराव पाटील व आ. जयकुमार गोरे यांचे दोन गट पडले. दोन्ही गट एकमेकाला संपविण्याच्या नादात तालुक्‍यातील चाळीस वर्षाची कोरेगाव पंचायत समितीत असलेली सत्ता गेली. तालुक्‍यात अवघ्या पंचायत समितीच्या दोन व जिल्हा परिषदेची एक अशी जागा कॉंग्रेसला मिळाली. तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रथम क्रमांकावर असलेला कॉंग्रेस पक्ष तालुक्‍यात तिसऱ्या क्रमांकावर गेला. याचा फायदा उठवत पुढे नावापुरता असलेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांनी कोरेगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरत गावो गावात राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात संघटना बांधून निवडणुका लढवल्या. निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देत कोरेगाव तालुक्‍यातील खेड (नांदगिरी), हिवरे, जांब-खुर्द, अशा अनेक मोठ्या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला. कोरेगाव विधानसभा मतदार संघात सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्य सुरू केले आहे. सार्वजनिक कामापासून ते वैयक्तिक कामापर्यंत लोकांना सहकार्य करत असल्याने कोरेगाव विधानासभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने चांगलाच जोर धरला आहे. हे भविष्यात राष्ट्रवादी पक्षाला डोके दुखीचे ठरणार आहे.
कोरेगाव तालुक्‍यात पुर्वी थोडा फार अस्तित्वात असलेला शिवसेना पक्ष नावापुरता उरला आहे. विद्यमान पं. स. सदस्य मालोजी भोसले वगळता इतर पदाधिकारी बोर्डावर नाव लावण्यापूरते आहेत. स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतही निवडून न येण्याची पात्रता असणारे कार्यकर्त्यांचे कार्य निवडणूक आल्यानंतर सुरू होते. तर काही पद घेवून पक्षाचे कार्य न करता स्वत:चा व्यवसाय करण्यातच मग्न असतात. त्यामुळे तालुक्‍यातील शिवसेना संपुष्टात येत चालली आहे.एकूणच भारतीय जनता पक्षाला आपले बळ वाढवण्याच्या दृष्टीने सध्या चांगली संधी आहे.या संधीचा फायदा भाजप नक्कीच घेईल असे सध्या दिसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत