आमदार सुरेश लाड यांचे उपोषण मध्यरात्री स्थगित, तटकरेंनी मध्यरात्री केला चंद्रकांत पाटलांना फोन

कर्जत : भूषण प्रधान

कर्जत खालापूर मतदार संघातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी काल उपोषण सुरु केले होते. ते उपोषण काल मध्यरात्री तीन वाजता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुरेश लाड यांनी मागे घेतले. रस्त्यांची रखडलेली कामे तत्काळ सुरु करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तटकरे यांना फोनवरून दिल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी आपले उपोषण सोडले.

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील विकासाच्या आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या विविध रस्त्यांची कामे सातत्याने शासकीय पातळीवर प्रयत्न करून मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून मंजुर करून घेतली आहेत. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे निविदा स्तरावर विलंब होत आहे याबाबत आमदार सुरेश लाड यांनी 12 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

उपोषणाच्या पहिल्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास आमदार सुरेश लाड त्यांच्या शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांची तब्बेत बिघडली आणि त्यांना ग्लानी आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजीव धनेगावे यांनी त्यांना तपासून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र लाड यांनी त्यास ठाम नकार दिला. त्यांनतर डॉक्टरांनी उपोषणाच्या ठिकाणीच त्यांना सलाईन लावण्याचा निर्णय घेतला. या घटनेने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. उपोषणाच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

दरम्यान आमदार सुरेश लाड यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना समजल्यानंतर त्यांनी मध्यरात्री २ च्या सुमारास उपोषण स्थळाला भेट देवून आमदार सुरेश लाड यांची विचारपूस केली. यावेळी सुनील तटकरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यावेळी मंत्र्यांनी रस्त्यांचे काम उद्या सकाळपासूनच सुरु होतील असे आदेश कोकण विभागीय अभियात्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती सुनील तटकरे यांनी आमदार सुरेश लाड यांना दिल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी शीतपेय पिऊन आपले उपोषण मागे घेतले.

मात्र उपोषण स्थगित केल्यानंतर रस्त्यांची कामे ही तात्पुरती सुरु न करता ती पूर्णत्वास गेली पाहिजे अशी मागणी सुरेश लाड यांनी केली आहे. ‘जर का सरकारने आमची फसवणूक केली तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू.’ असा इशारा आमदार सुरेश लाड यांनी सरकारला दिलंय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत