आरजे मलिष्काला कार्यालयात घुसून मारण्याची धमकी, शिवसेनेचा राग अनावर

मुंबई :रायगड माझा वृत्त 

 ‘मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?’  या एका गाण्याने महाराष्ट्रभर फेमस झालेल्या आरजे मलिष्काने यंदाही मुंबईवर झिंगाट गाणे बनवले. यावेळीही मुंबईचा पाऊस आणि खड्ड्यांवरुन तिने अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टार्गेट केले. मलिष्काचे हे सैराट गाणे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वांनाच भावले. मात्र, यावेळी शिवसेना नेत्यांचा राग अनावर झाला आहे. त्यामुळेच सोलापूरमधील शिवसेना नेत्याने आरजे मलिष्काच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली.

सोलापुरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रावण भवर यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे पदाधिकारी बाबासाहेब भवर यांचे भाऊ अतुल भवर हे कट्टर शिवसैनिक आहेत. भवर यांनीही मलिष्काचे व्हायरल झालेले गाणे पाहिले. त्यानंतर, त्यांनी मलिष्काच्या मुंबईतील कार्यालयात फोन करुन धमकी दिली. मुंबईची बदनामी करण्याचा ठेका तुम्ही उचलाय का?, मी सोलापुरात राहत असलो तरी महाराष्ट्राची राजधानी मुंबईविषयी मला प्रचंड आदर आहे. आमच्या राजधानीला कोणी नाव ठेवत असेल तर बाळासाहेबांचा शिवसैनिक शांत बसणार नाही. मुंबईमध्ये 105 जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. यापुढे जर मलिष्का यांनी अशी गाणी केली तर शिवसेनेकडून त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. शिवसेनेच्या रणरागिणी रेड एफएमच्या कार्यालयात घुसून मारतील. शिवसेना आमचा पक्ष आहे, मराठी आमची अस्मिता आहे आणि मुंबई आमची शान आहे.. जय महाराष्ट्र..’ असा संवाद भवर यांनी रेड एफएमच्या कार्यालयात साधला. रेड एफएम कार्यालयात अतुल भवर यांनी केलेल्या कॉलची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे.

दरम्यान, ‘गेली गेली मुंबई खड्डयात’ असे बोल असलेले गाणे मलिष्काने रेड एफएमच्या कार्यालयात गायले होते. तिचे हे झिंगाट गाणे महाराष्ट्रभर सैराट झाले. त्यामुळे शिवसेना नेत्याने मलिष्काला मुंबईबद्दल अस्मिता जागी ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न असेल, तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही दुसरं काहीतरी करा. पण, अशाप्रकारे मुंबईची बदनामी करु नका. अन्यथा शिवसेनास्टाईल उत्तर मिळेल, अशी धमकीही भवर यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत