आर्थिक निकषांवरच आरक्षण हवे : राज ठाकरे

पुणे : रायगड माझा वृत्त 

जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. सरकार तुमच्या भावनांशी खेळ करते आहे त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.

आर्थिक निकषांवर आरक्षण हवे : राज ठाकरे

मराठा समाजाने ज्या प्रकारे मोर्चे काढले त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. हकनाक स्वतःचा जीव गमावू नका असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले. मनसेचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी आपली ही भूमिका मांडली. आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर अनेक प्रश्न सुटतील असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. सरकार फक्त राजकारण करते आहे, पक्ष कोणताही असो. त्यांच्या राजकारणाला भुलू नका असे आवाहनही त्यांनी केले. सरकार लोकांच्या भावनांशी खेळ करत आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

काकासाहेब शिंदे या मुलाने नदीत उडी मारली. अशा प्रकारच्या घटना टाळा, जीव गमावून काहीही होणार नाही. जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल. एका जातीला आरक्षण दिले तर दुसऱ्या जातीला द्यावे लागेल. मराठी मुला-मुलींनी या मागचे राजकारण काय सुरू आहे ते समजून घ्या असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

मी इथे काही होर्डिंग्ज पाहिली. गुरू पौर्णिमा मेळावा, या मेळाव्याचा गुरु पौर्णिमेशी काहीही संबंध नव्हता. ही होर्डिंग्ज पाहूनच मला चित्र समोर आले की मी गंध लावून आशीर्वाद देत बसलो आहे की काय? या दिवसाचा आणि मेळाव्याचा काहीही संबंध नाही. मेळावा घ्यायचा होता म्हणून मेळावा घेतला. अशी टीका करत पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी झापले. मी इथे गुरुमंत्र वगैरेही काहीही देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

एवढेच नाही तर त्यांनी मराठी खासदारांवरही त्यांनी कडाडून टीका केली. मराठी खासदार आपल्या मराठी मुलांसाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी काहीही करताना दिसत नाहीत. संसदेत आवाज उठवत नाहीत. मंत्री, नेते तुमचा वापर करत आहेत, तुमचे घर उभे राहिले पाहिजे, संसार उभा राहिला पाहिजे यासाठी कोणीही काम करताना दिसत नाहीत अशीही टीका राज ठाकरेंनी केली. रोज खोटे बोलायचे, खोटे वागायचे हे सरकारचे धोरण झाले आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत