आशिष शेलारांचे बंधू विनोद यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप

मुंबई : रायगड माझा वृत्त 

माजी नगरसेवक आणि विद्यमान उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी एका महिलेने मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे विनोद शेलार यांना केव्हाही अटक होऊ शकते. पण त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या समर्थकांची धावाधाव सुरू आहे.

आशिष शेलारांचे बंधू विनोद यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप

विनोद शेलार यांनी गर्दीचा फायदा उचलत शारीरिक स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सदर महिला मालाड पश्चिम येथील पोलीस ठाण्यात पोहचली. मात्र पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तक्रार दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. विनोद शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचे बंधू आहेत. त्यामुळे वरून दबाव आल्याने मालाड पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पण या महिलेने विनोद शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बोरिवली मॅजिस्ट्रेट कोर्टात सीआरपीसी कलम १५६(३) अन्वये खटला दाखल केला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी विनोद शेलार यांना अटक होऊ शकते.

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली किंवा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला तर, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अन्वये कोर्टात खासगी तक्रार दाखल करता येते. त्यावर कोर्ट पुरावे पाहून पोलिसांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे किंवा थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत