आ. शशिकांत शिंदेंच्या बैठकीकडे नगरसेवकांची पाठ

कोरेगाव नगरपंचायतीच्या आढावा बैठकीला अवघे तिघे उपस्थित

कोरेगाव: रायगड माझा वृत्त 

कोरेगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे बहुमत असतानाही आ. शशिकांत शिंदे यांनी घेतलेला आढावा बैठकीस उपाध्यक्षांसह अवघे तीन नगरसेवक हजर होते. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह बहुसंख्य नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने आ. शशिकांत शिंदे यांच्याविषयी नगरपंचायतीमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक दीड वर्षांपूर्वी पार पडली. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्यासह भाजप, शिवसेना, मनसे या पक्षांनी उमेदवार उभे केले होते. परंतु, खरी लढत राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे 9 व कॉंग्रेसचे 8 उमेदवार निवडून येवून राष्ट्रवादीला निसटते बहुमत मिळाले. नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष बनण्यासाठी राष्ट्रवादीतून राजाभाऊ बर्गे व संजय लक्ष्मण पिसाळ इच्छुक होते. कोरेगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर दबाव टाकून कोरेगाव नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष बनण्याचा पहिला मान राजाभाऊ बर्गे यांना मिळाला. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे कॉंग्रेसला सदस्यांना विरोधी न मानता सर्वांना एकत्र घेवून कारभार करू लागले. त्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांची राजाभाऊ बर्गे यांच्याविषयी नाराजी वाढत गेली. राजाभाऊ बर्गे यांनीही नगरपंचायतीमध्ये कोट्यवधींच्या निधीतून विकासकामे सर्व सदस्यांना बरोबर घेवून आ. शशिकांत शिंदे यांना बाजूला ठेवून केली.
या पार्श्‍वभूमीवर आ. शशिकांत शिंदे यांनी दि.18 रोजी कोरेगाव नगरपंचायतीची आढावा बैठक बोलावली होती.

बैठकीस नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपाध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह सर्व सदस्यांना निमंत्रित केले होते. परंतु, बैठकीस राजाभाऊ बर्गे, कॉंग्रेसचे सदस्य यांच्यासह अनेक सदस्यांनी पाठ फिरवली. उपाध्यक्ष जयवंत पवार, सदस्य संजय पिसाळ, नागेश कांबळे तीनच सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या महिला सदस्यांऐवजी नगरपंचायतीच्या कारभारात सतत लक्ष घालणारे काही महिला सदस्यांचे पतीराज उपस्थित होते. त्यामुळे तीन सदस्य, महिला सदस्यांचे पतीराज, सी.ओ. व नगर पंचायतीचे कामगार यांच्या उपस्थितीतच ही बैठक पार पडल्याने बैठकीची चर्चा कोरेगाव शहरात सुरु होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत