इंग्रजी माध्यमातून डीएडसाठी राखीव जागा नाहीत

पुणे: रायगड माझा 

राज्यात 2008 च्या शासन निर्णयाप्रमाणे इंग्रजी माध्यमातून डीएड करणाऱ्या शिक्षकांसाठी राखीव जागा राहणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्यात पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार आहे. मात्र त्याआधी शासनाने इंग्रजी माध्यमातून डीएड झालेल्यांसाठीचे 20 टक्‍के आरक्षण काढून टाकले आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी गणित व इंग्रजी हे दोन्ही विषय नसल्याने त्यासाठी इंग्रजी विषयातील शिक्षकांची गरज भासणार नाही. त्यामुळेच भविष्यात केवळ सहावी ते आठवीसाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची गरज आहे. तसेच राज्यातील अनेक शिक्षक इंग्रजी शिकविण्यासाठी तयार आहेत, त्यामुळेच हे 2008 सालच्या शासन निर्णयाप्रमाणे दिलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

इंग्रजी माध्यमातील शाळांना पवित्रतून सुट
ज्या शाळांना शासन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकारे कोणतेही अनुदान देत नाही अशा शाळांना पवित्र प्रणालीतून शिक्षक भरती करणे आवश्‍यक असणार नाही. यामध्ये सर्व विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. तसेच सर्व अल्पसंख्याक समाजाच्या शाळांना विशेष अधिकार असल्याने त्यांनाही पवित्रमधून भरती आवश्‍यक नाही. त्याचबरोबर राज्यात काही विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा आहेत; मात्र यातील ज्या शाळांना भविष्यात अनुदान मिळण्याची शक्‍यता आहे अशा सर्व शाळांना पवित्रमध्ये नोंदणी आवश्‍यक आहे. परंतु स्वयंअर्थसहाय्यित मराठी, इंग्रजी शाळांना ज्यांना भविष्यात कधीच अनुदान मिळणार नाही अशा शाळांना भरतीचा आदेश लागू नाही. राज्यात फार पूर्वी परवानगी दिलेल्या काही अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळाही आहेत त्यांना मात्र ही पवित्र प्रणाली लागू राहिल अशी माहिती शिक्षण विभागातील सुत्रांकडून मिळाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत