इंडोनेशियात झालेल्या भूकंपात ८२ जणांचा मृत्यू ,१००हून अधिक जण जखमी

जकार्ता : रायगड माझा वृत्त 

इंडोनेशिया देशातील लोम्बोक बेटाला बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात ८२ जणांचा मृत्यू झाला असून १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.९रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळं या परिसरात मोठ्याप्रमाणावर जीवित तसंच वित्तहानी झाली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोकच्या उत्तर भागातल्या जमिनीच्या १०.५ किलोमीटर खोलवर दाखवण्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बाली द्विपसमूहापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले असून या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या परिसरात त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. त्यामुळं स्थानिक तसंच पर्यटकांमध्ये भीतीचं वातावारण निर्माण झालं होतं. परंतु त्सुनामीचा धोका टळला असल्याचं तेथील हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

भूकंपामुळं कोसळलेल्या इमारतींच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं असल्याचं असं इंडोनेशिया आपत्ती निवारण यंत्रणेचे प्रवक्ते सुतोपो पूर नोग्रोहो यांनी सांगितलं. यामुळं भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सर्व नागरिक भीतीनं घराबाहेर आले आणि अनेक जणांचा मृत्यू झाला असं लॉम्बॉक आपत्कालीन विभागाचे अधिकारी इवान अस्मारा म्हणाले. गेल्या आठवड्यात याच परिसरात भूकंपाच्या जोरदार धक्क्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत