इंदापूर विधानसभा राष्ट्रवादीच लढणार

अंथुर्णेतील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी केले जाहीर : आघाडी होण्याआधीच बिघाडी?

इंदापूर : रायगड माझा

इंदापूर तालुक्‍यातील मला अंड्डी पिल्ल मला माहिती आहेत, त्यामुळे येथे शरद पवार आले नाहीत म्हणून उगीच कांड्या पिटवू नका. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समविचारी पक्ष यांना एकत्र घेऊन आघाडी करेल; परंतू ज्या जागांवर आमचे वर्चस्व आहे यात बदल होणार नाही, वाटेल ते झाले तरीदेखील इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार नाही, एकवेळ आघाडीला या जागेसाठी तडा जाईल; पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच या ठिकाणी लढणार, त्यामुळे चिंता करू नका असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने आता आघाडी होण्याआधीच बिघाडी होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इंदापूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत भरणेवाडी ग्रामसचिवालय व अंथुर्णे ग्रामपंचायतीच्या शाहु-फुले-आंबेडकर ग्रामअभ्यासिकाचे उद्‌घाटन व शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, विधानपरीषेदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप सोपल, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, सरकारचे काम फसवे आहे,पैसातून सत्ता चालवण्यांचा धंदा भाजपने चालवला आहे, नक्की कोणत्या वर्षी कर्जमाफी देणार याचा मेळ नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळत नाही, उसाला दर मिळण्यासाठी शरद पवार चकरा मारतात तर आमदार राहूल कुल यांच्या कारखान्यावर जप्ती आली. काय चालंल आहे हे समजणारे नाही. लाखाचा पोशिंदा मारण्याच काम सरकार करते आहे. तर पाणी असताना नियोजन नाही, जनता उपोषणाला बसली तरी देखील नीरा नदीला पाणी सोडत नाहीत. व नियम दाखवतात. मला नियम दाखवता का असा दम सरकारला अजित पवार यांनी दिला.

धनंजय मुंडे म्हणाले की, गडकरी म्हणतात “अच्चे दिन को मेहसुस करना पडता हैं! अच्छे दिन नावावर जनतेला फसविले गेले. बॅंक खात्यावरील 15 लाख कुठे आहेत याचा जाब जनता विचारत आहे. पंतप्रधान मोदि म्हणतात की, महागाई वाढणार नाही; परंतु सिलिंडर व इतर वस्तूची किंमत का वाढवली याचे उत्तर भाजपकडे नाही. सातबारा कोरा करायचा खोटा प्रचार झाला; परंतु सातबारा कोरा करायला शरद पवार यांच्यासारखे जिगर लागतात हे कोणाचेही काम नाही असाही टोला मुंडे यांनी लगावला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, आत्माराम कलाटे, अर्चना घारे, पौर्णिमा तावरे, वैशाली नागवडे, मच्छींद्र चांदणे, राणी शेळके, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, अशोक घोगरे, विरसिह रणसिंग, अशोक चोरमले, वैशाली पाटील, सागर मिसाळ, यशवंत माने, शुभम निंबाळकर, सोमनाथ वाघमोडे, संजय चव्हाण, योगेश डोंबाळे, अनिल काळे, अंथुर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका शिंदे, उपसरपंच उज्वला साबळे, भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना गायकवाड, उपसरपंच अंबादास म्हस्के यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले तर साबळे यांनी आभार मानले.

पायाची दुखापत झाल्याने शरद पवार आलेले नाहीत; परंतु आपणाला पवार महत्वाचे आहेत, ते पून्हा येणार आहेत, राज्यांत वेगळी परीस्थिती आहे; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इंदापूर तालुक्‍यातील विरोधक भाजप-शिवसेना नसून कॉंग्रेस पक्ष आहे. बदनाम कॉंग्रेसचे नेते करतात, परंतु येथे 365 दिवस राष्ट्रवादी पक्षच काम करतो,.
-दत्तात्रय भरणे, आमदार

शरद पवार इंदापुरात येणार
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्‍यातील जनतेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रक्कमेचा निधी दिला म्हणून दत्तात्रय भरणे आमदार झाले. इंदापूर तालुक्‍याचे प्रेम राष्ट्रवादीवर आहे त्यामुळे शरद पवार घरातून बाहेर पडले की पवार पहिल्यांदाच इंदापूरला येणार असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
अंथुर्णे (ता. इंदापूर) : येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. यावेळी उपस्थित शेतकरी.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत