नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (दि. 10) सहा तासांचा भारत बंद पुकारण्यात आला आहे. सर्व विरोधी पक्षांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत आणि मुख्य प्रवक्ते सुरजेवाला, खजिनदार अहमद पटेल यांनी सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्याने त्यांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ होणार्या आंदोलनात त्यांच्या पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत. जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी हा बंद केवळ सहा तासांचाच असेल, असे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले. बंदच्या काळात देशभरात सर्व पेट्रोल पंपांवर धरणे आंदोलन केले जाणार आहे. चालू वर्षअखेरीस चार राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापाठोपाठ पुढील वर्षाच्या प्रारंभी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात जनमत तयार करण्याच्या हेतूने काँग्रेसने पेट्रोल, डिझेलचा मुद्दा तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत हा बंद पाळला जाणार आहे. राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांनीही बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले. पेट्रोल, डिझेलबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसचेही दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.