इतिहासात पहिल्यांदा शरद पवारांना लोकसभा निवडणूक हारावी लागेल-चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवारांना इतिहासात पहिल्यांदा लोकसभा निवडणूक हारावी लागेल. माढा व बारामतीची जागाही आम्ही जिंकणार असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणेरीमठ येथे कार्यक्रमासाठी दोन-तीन दिवसांत कोल्हापुरात येण्याची खात्री आहे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा एक दिवस आधी कळवला जात असल्याने 9 मार्चपर्यंत ते कोल्हापुरात येतील. दोन दिवसांत राज्यात मोठ्या घडामोडी होतील. कुंपणावर असलेल्या अनेकांनी रंग बदलेले पहायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

शिवाजी पेठ निवृत्ती चौकातील अर्ध शिवाजी पुतळा सुशोभीकरण व समर्पण कार्यक्रम रविवारी सायंकाळी झाला. मंत्री पाटील यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर,  आ. राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले आदी प्रमुख मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असून, पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील. हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. आता तर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या लष्करी कारवाईमुळे जनतेमध्ये चांगला संदेश गेला आहे. महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती होणार, याची मला खात्री होती. कारण या दोन्ही पक्षाचे रक्‍त एक आहे. आम्हाला बांधून ठेवणारा धागा एक आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला मदत होईल अशी भूमिका कधीही घेतली नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  युती करतील, हे मला माहीत होते. मी उद्यापासून जिल्ह्यांतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. शरद पवारांनी माझ्या घरातच भेद केला आणि माझी पत्नी जरी काँग्रेसमधून निवडणुकीस उभी राहिली, तरी मी युतीचाच प्रचार करेन. कारण मी भाजप आणि संघाच्या मुशीतील कार्यकर्ता आहे.

कोल्हापुरात मोठ्या संख्येने पर्यटक यावेत. हे पर्यटक येथे चार दिवस कुटुंबासह रहावेत. म्हणजे येथील हॉटेल्स, रेस्टारंट, खानावळी जोरात चालतील. तसेच व्यापारही वाढेल. यामुळे कोल्हापूरचा विकास होईल. कोल्हापूर श्रीमंत झाले पाहिजे, असे मला वाटत असल्याने मी शहर सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील असतो. उद्योग, शेती सर्वच क्षेत्रात कोल्हापूरला पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करू या. कणेरीमठ येथे मोठ्या संख्येने प्राचीन इतिहास पाहण्यासाठी लोक येत असून, अशा पद्धतीने शहराच्या आसपास पर्यटनस्थळांचा विकास झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर म्हणाले, निवृत्ती चौकामुळेच माझे आणि कोल्हापूरचे नाते जुळले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोठेही असले तरी त्यांचे कोल्हापूरकडे लक्ष असते. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरील उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आहे.

आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण सुरू असून, चौकांचा चेहरा बदलत आहे. गेल्या पाच वर्षांत विविध कामे मार्गी लावली आहेत. माजी उपमहापौर शिवसेना शहरप्रमुख रवीकिरण इंगवले म्हणाले, भविष्यात कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास महापौर भाजपचा होईल.निवृत्ती चौकाच्या सुशोभीकरणासाठी राजकीय नेते आणि महापालिकेचे अधिकारी यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर सरिता मोरे म्हणाल्या, निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवपे्रेमींची अस्मिता आहे. छत्रपती शिवरायांचे तेजस्वी विचार तरुणांनी जपावे.यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, माजी महापौर बाजीराव चव्हाण, विक्रम जरग, सुनीता राऊत, सुनील मोदी, ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई, विकी महाडिक, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे, लालासो गायकवाड, अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांच्यासह शिवाजी पेठेतील नागरिक मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत